ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघासाठी एकूण ३५५ अर्जांचे वितरण करण्यात आले होते. यापैकी १११ उमेदवारांनी १३६ अर्ज भरले होते. शनिवारी झालेल्या छाननीमध्ये १११ उमेदवारांपैकी ९१ उमेदवारांचे अर्ज वैध तर, २० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे भिवंडीत सर्वाधिक ३६, कल्याणमध्ये ३० आणि ठाण्यामध्ये २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यापैकी कोणते उमेदवार माघार घेणार की, इतकेच उमेदवार रिंगणात असणार, हे चित्र सोमवारी स्पष्ट होईल.
ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी असे तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडीसह विविध पक्षांसह अपक्ष इच्छुक उमदेवारांनी अर्ज भरले आहेत. या तिन्ही मतदारसंघात २६ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज वितरीत आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. काही उमेदवारांनी दोन ते तीन अर्ज दाखल केले होते. यामुळे ३ तारेखपर्यंत तिन्ही मतदारसंघांमध्ये १११ उमेदवारांचे एकूण १३६ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जाची शनिवारी छाननी करण्यात आली. यामध्ये २० अर्ज बाद झाले आहेत तर, ९१ अर्ज वैध ठरले आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी १०५ उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात आले होते. यापैकी ३६ उमेदवारांनी ४३ अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननी प्रक्रियेत ३६ पैकी २५ अर्ज वैध तर, ११ अर्ज अवैध ठरले. कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक १३७ उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात आले होते. त्यापैकी ३४ उमदेवारांनी ४५ उमेदवारी अर्ज भरले होते. अर्ज छाननी प्रक्रियेत ३४ पैकी ३० अर्ज वैध तर, ४ अर्ज अवैध ठरले. भिवंडी लोकसभा मतदारसंघात ११३ उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात आले होते. त्यापैकी ४१ उमेदवारांनी ४८ अर्ज भरले होते. अर्ज छाननी प्रक्रियेत ४१ पैकी ३६ अर्ज वैध ठरले तर, ५ अर्ज अवैध ठरले, अशी माहिती सुत्रांनी दिली. या तिन्ही मतदारसंघात कोणते उमेदवार माघार घेणार की, इतकेच उमेदवार रिंगणात असणार, हे चित्र सोमवारी स्पष्ट होईल.