ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट, गुटखा यांसारख्या पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामार्गत तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा चांगला परिणाम दिसू लागला असून २०१७ ते २०२४ या कालावधीत ९३६ शाळांना ‘तंबाखू मुक्त’ करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
शाळेतील इयत्ता आठवी ते १० वीच्या विद्यार्थी अनेकदा विविध कारणांमुळे व्यसनांच्या आहारी जात असतात. शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला बंदी असतानाही परिसरात छुप्या पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असते. गेल्याकाही वर्षांत ई- सिगारेटच्या व्यसनाचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढले आहे. विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्ग ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने तंबाखू मुक्त शाळा सुरू करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. २०१७ मध्ये ‘सलाम मुंबई’ या संस्थेच्या मदतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.
सलाम मुंबई संस्थेने एक ॲप तयार केले होते. या ॲपमध्ये शाळांची नोंदणी करण्यात येते. यामध्ये काही निकष ठरविले जात असतात. या निकषांनुसार, शाळेमध्ये तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी समिती तयार करणे, तंबाखू नियंत्रित करण्यासाठी शाळेची तपासणी करणे, विविध उपक्रम राबविणे असे या उपक्रमाचे निकष होते. या निकषांची पूर्तता करत मागील सात वर्षांत ठाणे जिल्ह्यातील ९३६ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना तंबाखू किंवा तंबाखू जन्य पदार्थांचे व्यसन होते. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून याबाबत माहिती दिली जाते. त्यानंतर डाॅक्टरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समूपदेशन केले जात आहे. विद्यार्थ्यांना कर्करोग, मौखिक विकार याची माहिती दिली जात आहे. त्याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांवर होतो असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.
हेही वाचा… डोंबिवलीतील कोपर शिवसेना शाखेजवळ बेकायदा इमारतीचे बांधकाम, व्यापारी गाळे बांधून विक्रीची तयारी
तंबाखू मुक्त शाळेसाठी उपक्रम राबविण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत ९३६ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. – डाॅ. अर्चना पवार, दंत शल्य चिकित्सक, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय.