ठाणे : ठाणे जिल्ह्यात भाजपने ९ पैकी ९ तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ पैकी ६ जागा जिंकल्या असून या दोन्ही पक्षांच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रत्येकी एक जागा वाढल्याचे दिसून येत आहे. मुरबाड, मिरा-भाईंदर, कल्याण पुर्व, भिवंडी पश्चिम, बेलापूर या मतदार संघातील चुरशीच्या लढतीत विजय मिळवत भाजप जिल्ह्यातील सर्वाधिक जागा जिंकणारा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात भाजपची सरशी झाली असून भाजप मोठा भाऊ तर, शिंदेची सेना लहान भाऊ ठरल्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पुुर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पुर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मिरा-भाईंदर, ओवळा-माजीवाडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या मतदार संघाचा समावेश आहे. या सर्वच मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता. ठाणे आणि कल्याण ग्रामीणमध्ये मनसेमुळे तिरंगी लढत झाली होती. या सर्वच मतदार संघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर सभा घेण्याबरोबरच रॅलींमध्ये सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील १८ पैकी १६ जागांवर महायुतीने विजय मिळविला आहे तर, केवळ दोनच जागा महाविकास आघाडीला जिंकता आल्या आहेत. जिल्ह्यातील १८ पैकी ९ जागा भाजपने लढविल्या. त्यामध्ये भिवंडी पश्चिमेतील उमेदवार महेश चौगुले, मुरबाडमधील उमेदवार किसन कथोरे, उल्हासनगरमधील उमेदवार कुमार आयलानी, कल्याण पुर्वमधील उमेदवार सुलभा गायकवाड, डोंबिवलीमधील उमेदवार रविंद्र चव्हाण, मिरा-भाईंदरमधील उमेदवार नरेंद्र मेहता, ठाणे शहरमधील उमेदवार संजय केळकर, ऐरोलीमधील उमेदवार गणेश नाईक, बेलापूरमधील उमेदवार मंदा म्हात्रे यांचा समावेश होता. महायुतीच्या नेत्यांमधील अंतर्गत मतभेदामुळे मुरबाड आणि कल्याण पुर्व मतदार संघात भाजपचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या मोठ्या मताधिक्यामुळे भिवंडी पश्चिमेतही भाजपचा पराभव होण्याचा अंदाज व्यक्त होत होता. बेलापूर मतदार संघामध्ये निवडणुक काळातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन संदिप नाईक यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षातून मिळवलेली उमेदवारी, मिरा-भाईंदरमध्ये झालेली बंडखोरी, यामुळे या सर्वच ठिकाणी अटीतटी लढत झाली. या लढतीत भाजपने बाजी मारत ९ पैकी ९ जागा जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजप आठ जागा जिंकला होता. यंदा या आठही जागांबरोबरच मिरा-भाईंदरची जागा भाजपने जिंकली असून यामुळे जिल्ह्यात भाजपची एक जागा वाढल्याचे चित्र आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्रिपदी शिंदेच हवेत, ठाण्यातील मंदिरांमध्ये शिंदे गटाची आरती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाणे जिल्ह्यात ७ जागा लढविल्या. त्यापैकी भिवंडी ग्रामीणमधील उमेदवार शांताराम मोरे, अंबरनाथमधील उमेदवार डाॅ. बालाजी किणीकर, कल्याण पश्चिमेतील उमेदवार विश्वनाथ भोईर, कोपरी-पाचपाखाडी उमदेवार एकनाथ शिंदे, ओवळा-माजिवडामधील उमेदवार प्रताप सरनाईक, कल्याण ग्रामीणमधील उमेदवार राजेश मोरे हे सहा उमेदवार विजयी झाले. भिवंडी पुर्वची जागा शिंदेच्या शिवसेनेने लढविली होती. येथे भाजप नेते संतोष शेट्टी यांना पक्ष प्रवेश देऊन शिंदेच्या सेनेने उमेदवारी दिली होती. तर, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा शिंदेच्या सेनेत पक्ष प्रवेश झाला होता. यामुळे ही जागा शिंदेची सेना जिंकेल असा अंदाज होता. परंतु या जागेवर शिंदेच्या सेनेचे उमेदवार शेट्टी यांचा पराभव झाला. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांचा पराभव होईल, असा अंदाज वर्तवली जात होता. परंतु अखेरच्या क्षणी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांनी प्रचाराची आखलेली रणनिती आणि ठाकरे गटाच्या काही नेत्यांचा केलेला पक्षप्रवेश यामुळे या जागेवर मोरे यांचा विजय झाल्याची चर्चा आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघातील उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे हे स्वत: मैदानात उतरले होते. यामुळेच राजेश मोरे हे विजयी झाले तर, मनसेचे प्रमोद पाटील यांचा पराभव झाला. जिल्ह्यातील ७ पैकी ६ जागा जिंकून शिंदेची शिवसेना जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. गेल्यावेळी जिल्ह्यातील शहापूर आणि कळवा-मुंब्रा या दोन्ही राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. यंदा यापैकी शहापूरची जागा अजित पवार गटाला तर, कळवा मुंब्य्राची जागा शरद पवार गटाने जिंकली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची जागांमध्ये कोणतीच घट झालेली नसून मनसेची एक जागा कमी झाली आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांविरोधातील उमेदवाराचा शिंदे सेनेत प्रवेश
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यातील घराघरात शिवसेना पोहचविण्याचे काम केले. त्यांचे जिल्ह्यात वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेची सुत्रे हाती घेतली. जिल्ह्यात स्वत:चे वर्चस्व निर्माण केले. शिवसेनेतील बंडानंतरही अनेक लोकप्रतिनिधींनी शिंदे यांची साथ दिली. यामुळे शिंदे यांचे वर्चस्व कायम राहिल्याचे दिसून आले. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यात आता विधानसभा निवडणुकीत भाजपची भाजपची सरशी झाल्याचे दिसून येत आहे.