ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा कौपीनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या हालचाली सुरू असून त्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंदिराची नुकतीच पाहणी केली. माती आणि बांधकाम संरचनात्मक परिक्षणानंतर ही वास्तू दुरुस्त करायची की संपूर्ण मंदिराचा नव्याने जिर्णोद्धार करायचा, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कौपीनेश्वर मंदिर परिसरात भाजी मंडई आणि ठाण्याची मुख्य बाजारपेठ आहे. हा परिसर दाटीवाटीचा आणि गर्दीचा आहे. या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचा संकल्प केला असून त्यासाठी त्यांनी मंदिर परिसराची विश्वस्तांसोबत पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नुकतीच विश्वस्तासमवेत मंदिर परिसराची पाहणी करून बैठक घेतली. बैठकीस विश्वस्त अनिकेत भावे, सचिव रवींद्र उतेकर, खजिनदार मकरंद रेगे हे उपस्थित होते. मंदिराचे माती आणि बांधकाम संरचनात्मक परिक्षण या कामाची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत सांगितले. मुख्य मंदिराची रचना, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व, मंदिराच्या नवीन गाभाऱ्याचा परिसर, मंदिराचा कळस, सभामंडपाची व्याप्ती, वास्तुविशारद नेमणे तसेच निधीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : निरोगी राहण्यासाठी योगसाधना प्रभावी उपचार पध्दती, डोंबिवलीतील परिसंवादात तज्ज्ञ डाॅक्टरांची मते

कौपीनेश्वर मंदिर हे ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच आजूबाजूचा परिसर, मंदिराची इमारत, दशक्रिया विधी परिसर याबाबत नियोजन करताना मंदिराचे विश्वस्त या सर्वांना विश्वासात घेवून कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी बैठकीत सांगितले. तर भाजी मंडई, त्या परिसरात असणारे मंदिराचे प्रवेशद्वार परिसर सुशोभित करण्यासाठीही योग्य ती कार्यवाही करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. सुशोभिकरणाबाबत पुण्यातील वास्तुरचनाकार अरूण कलमदानी यांनी मंदिर तसेच या परिसरात होणारे उपक्रम, येणारे भक्त आणि मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन एक आराखडा तयार केला आहे. तो आराखडा पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी पहावा अशी विनंती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली.

हेही वाचा : ठाण्यातील आर्थिक दुर्बल घटकांची म्हाडा घरे महाग! निश्चित किमतीत विकासकाकडून परस्पर सहा लाखांची वाढ

ती विनंती मान्य करुन हा आराखडा पाहून संबंधित वास्तुरचनाकारांशी चर्चा करू, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. मंदिराचे माती आणि बांधकाम संरचनात्मक परिक्षणानंतर ही वास्तू दुरुस्त करायची की पूर्ण मंदिराचा नव्याने जिर्णोद्धार करावा हे स्पष्ट होईल. तसेच माती परिक्षण केल्यानंतर खडक किती अंतरावर आहे, पाणी किती खोलीवर आहे हे कळेल, त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्यानंतरच स्पष्ट होतील. तसेच जर मंदिराचा पूर्ण जिर्णोद्धार करायचा झाल्यास ऐतिहासिक वास्तू व त्याकाळात करण्यात आलेले दगडी बांधकाम याचा विचार करुनच बांधकाम करावे लागेल, त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती दर्शक माहिती देऊन त्या पुढील निर्णय त्यांच्या निर्देशाप्रमाणे घेऊन कार्यवाही करु, असे बांगर यांनी सांगितले. त्यास विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी सहमती दर्शवली.

हेही वाचा : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याला पाच महिन्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी कल्याणचे अशोक होनमाने

ऐतिहासिक मंदिर

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात कौपिनेश्वर मंदीर आहे. याठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचे चार फूट तीन इंच उंचीचे आणि १२ फुटी घेर असलेले शिवलिंग आहे. ठाणेकरांची ग्रामदेवता असलेले कौपिनेश्वर मंदिर शिलाहार राजांच्या राजवटीच्या काळामध्ये इ. स. ८१० ते १२४० दरम्यान बांधले गेले. १८७९ मध्ये वर्गणी गोळा करून मंदिराचा पुन्हा जीर्णोध्दार करण्यात आला. त्यानंतर १९९६ मध्ये या सभामंडपाचाही जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane district collector and municipal commissioner inspects shree kopineshwar temple for its renovation css
Show comments