ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये आचार संहितेच्या काळात मागील सुमारे एक महिन्याच्या कालावधीत २३ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १२ कोटी रुपयांची रोख रक्कम पकडण्यात आली असून यातील सर्वाधिक ४ कोटी रक्कम शहापूर विधानसभा मतदारसंघातून जप्त करण्यात आली आहे. तर भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून तब्बल १ लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. तर ओवळा माजिवडा मतदारसंघातून १ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. तर ठाणे शहर विधानसभेतून ३ कोटी ३३ लाख रुपयांचे मतदारांना वाटण्यासाठीचे मोफत साहित्य जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागांच्या पथकांकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत असते. यामध्ये अवैध पद्धतीने रोख रक्कम, मद्य, अंमली पदार्थ आणि मतदारांना वाटण्यासाठी नेण्यात येणाऱ्या वस्तू यांसारखा मुद्देमाल निवडणूक विभागाच्या पथकाकडून कारवाई करून जप्त करण्यात येत असतो. याच पद्धतीने जिल्ह्यात आचार संहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एकूण २३ कोटी ४१ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १२ कोटी ४१ लाख १६ हजार रोख रक्कम, २ कोटी २२ लाख १४ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा, १ कोटी ६४ लाख ७० हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, २३ लाख २६ हजार रुपये किंमतीच्या मौल्यवान वस्तू, दागिने आणि ६ कोटी ८९ लाख ७९ हजार रुपये किंमतीचे मोफत वाटपाचे साहित्य ठाणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमधून प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे.
सर्वाधिक घबाड कुठे ? ( विधानसभा निहाय सर्वाधिक रक्कम )
शहापूर – ४ कोटी
बेलापूर – ३ कोटी २४ लाख
भिवंडी पूर्व – २ कोटी ३० लाख
मीरा भाईंदर – १ कोटी ४९ लाख
सर्वाधिक मद्य (रुपये)
भिवंडी ग्रामीण – ४८ लाख
कल्याण पूर्व – ३५ लाख
शहापूर – २२.७४ लाख
सर्वाधिक अंमली पदार्थ (रुपये)
ओवळा माजिवडा – १ कोटी २६ लाख
ऐरोली – १४ लाख
हे ही वाचा… ठाणे जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला
सर्वाधिक मोफत वाटपाचे साहित्य (रुपये)
ठाणे – ३ कोटी ३३ लाख
भिवंडी ग्रामीण – ८८ लाख
बेलापूर – ५१ लाख
भिवंडी पश्चिम – ४७ लाख