कल्याण : ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ ग्रामीण भागात पडलेल्या अवकाळी पावसाने भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शनिवारी आणि रविवारी असा सलग दोन दिवसात या भागात अवकाळी पाउस झाला. रब्बी हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी भेंडी, काकडी, कारली अशा वेगवेगळ्या फळ, वेलवर्गिय रोपांची लागवड केली आहे. पावसाने, गारपिटीने ही लागवड झोडपून काढल्याने आगामी रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकरी दिवाळीनंतर भात झोडणीची कामे सुरू करतो. पावसाळ्यात गोधनासाठी लागणाऱ्या पेंढ्याची तयारी करून ठेवतो. भात मळणी सुरू असतानाच शनिवारपासून अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे भाताचे नुकसान झाले आहे. खळ्यावर ठेवलेल्या भात पिकाच्या पेंढ्या पावसात भिजल्या आहेत. या पेंढ्या खराब झाल्याने गोधनाला मार्च ते जून कालावधीत वैरण म्हणून खाण्यास काय घालायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
हेही वाचा : जुन्या आनंद आश्रमाच्या आठवणीत सगळेच रमले
भात पिके कापून झाल्यानंतर शेतकरी हरभरा, वाल, मूग, माळरानावर भेंडी, कारली, वांगी, गवार अशा पिकांची नव्याने लागवड करतो. आता नव्याने केलेली ही लागवड शनिवारच्या मुसळधार पावसात, शहापूर, मुरबाड भागात गारपिटीने झोडपून निघाली आहे. त्यामुळे या रोपांची पुन्हा लागवड करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. रब्बी हंगामातील बियाणे महाग असते. त्यामुळे तो बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे. शासनाने शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी तात्काळ निधी देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. झाडांची पडझड झाली आहे.