ठाणे : ठाणे जिल्ह्यात विशेषत: ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी या सारख्या शहरात अरुंद रस्ते, विविध प्रकल्पांची कामे, अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. असे असतानाच, दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात मागील सुमारे अडीच वर्षात तब्बल साडे पाच लाख नव्या वाहनांची नोंद झाल्याचे परिवहन विभागाच्या आकडेवारीतून समोर येत आहे.
सर्वाधिक वाहनांची नोंद ठाणे विभागात झाली आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्हा मुंबईपासून जवळचा भाग असल्याने मुंबईत कामानिमित्ताने जाणाऱ्या नोकरदारांनी ठाणे जिल्ह्यात गृह खरेदीला प्राधान्य दिले. जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहेत. त्यातच शहरात नव-नवे गृहप्रकल्प तयार होत आहे. घोडबंदरचा विस्तार गायमुख-नागलाबंदर पर्यंत गेला आहे. तर भिवंडीसारख्या गोदामाच्या शहराला देखील आता ‘नवे ठाणे’ अशी बिरुदे मिळू लागली आहे.
भिवंडीतील कशेळी-काल्हेर भागात मोठ्याप्रमाणात नागरिक वास्तव्यास जात आहेत. जिल्ह्यात काही वर्षांपासून मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर- कासारवडवली) आणि मेट्रो पाच (ठाणे-भिवंडी-कल्याण) मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. तसेच घोडबंदर, मुंबई नाशिक महामार्गाचे रुंदीकरण अशी विविध मोठी प्रकल्प जिल्ह्यात सुरु आहेत. त्यामुळे रस्ते आक्रसले गेले आहेत.
शहरात लोकसंख्या वाढल्याने त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही बसत आहेत. परिवहन सेवेचच्या अपुऱ्या सुविधा यामुळे नागरिक खासगी वाहनाने स्थानक गाठतात. त्यामुळे स्थानकांमध्येही गर्दी होत असते. तर, रेल्वेची गर्दी टाळण्यासाठी काही नोकरदार खासगी वाहनाने मुंबईला जाण्यास पंसती देत असतात.
हलक्या वाहनांची वाहतुक त्यासोबतच गुजरात, भिवंडी, उरण मार्गावर सुरु असलेली अवजड वाहनांची वाहतुक देखील सुरु असते. त्यामुळे वाहन चालकांना दररोज कोंडीचा फटका सहन करावा लागत असतो. परंतु मागील सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीत म्हणजेच, १ जानेवारी २०२३ ते २० एप्रिल २०२५ या कालावधीत ठाणे जिल्ह्यात पाच लाख ७३ हजार ५५९ वाहनांची नोंद झाली आहे. परिवहन विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
सर्वाधिक वाहनांची नोंदणी ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या क्षेत्रात झाली. ठाणे उप प्रादेशिक परिवहन विभागात ठाणे, भिवंडी शहर आणि ग्रामीण पट्टा येतो. कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागात डोंबिवली ते बदलापूर आणि ग्रामीण क्षेत्राचा सामावेश आहे. तर वाशी उपप्रादेशिक परिवहन विभाग क्षेत्रात नवी मुंबई शहराचा सामावेश आहे. ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागात दोन लाख ८० हजार ८०१, कल्याण उप प्रादेशिक परिवहन विभागात एक लाख ९८ हजार ५२ आणि वाशी उपप्रादेशिक परिवहन विभागात ९४ हजार ७०६ नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे.
पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतुक सुविधा आणखी उपलब्ध झाल्यास खासगी वाहनांच्या वापराच्या संख्येमध्ये नक्कीच कमतरता येईल. घाटकोपर- अंधेरी मेट्रोचा वापर आज प्रमाणात होत आहे. ठाणे जिल्ह्यातील मेट्रोची कामे पूर्ण झाल्यास त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. तसेच वाहतुकीच्या वेळा देखील निश्चित करायला हव्यात.
सार्वजनिक वाहतुक सुविधांचा वापर अधिक वाढल्यास व्यक्तीला मानसिक ताण देखील कमी होईल तसेच इंधन खर्च देखील बचत होईल. खासगी कंपनीच्या कार्यालयांनीही त्यांच्या वेळांमध्ये बदल केल्यास रस्त्यावरील होणाऱ्या वाहनांचा ताण कमी होईल. – डाॅ. शंकर विश्वनाथ, वाहतुक तज्ज्ञ.
वार्षिक आकडेवारी
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३
ठाणे – १, १२, ४३४
कल्याण- ७९, ४३३
वाशी- ३८,५१८
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४
ठाणे – १,२७,०२८
कल्याण- ८९,२४५
वाशी- ४२,२५५
१ जानेवारी ते २० एप्रिल २०२५
ठाणे – ४१,३३९
कल्याण- २९,३७४
वाशी- १३,९३३