ठाणे : जिल्ह्यातील नदीपात्रातील आणि खाडीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे भरारी पथकांची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात भरारी पथकांच्या धडक कारवाईमुळे अवैध रेती उपसा पूर्णपणे बंद झाला होता. या पथकांची धडक मोहीम आता मात्र थंडावल्याने वाळू माफियांना मोकळे रान मिळाले असून मुंब्रा दिवा खाडीत रेतीचा दिवसाढवळ्या अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थित कल्याण डोंबिवली येथील खाडी परिसरात देखील दिसून येत आहे. यामुळे जिल्हा महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्यातील दिवा, मुंब्रा, ठाणे, कल्याण येथील खाडी पत्रातून तसेच उल्हासनगर येथील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी लागणारी वाळू उपलब्ध होते. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील रेतीचा अधिकृत लिलाव थांबल्याने येथून अधिकृत वाळू उपसा होत नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठ्या महसुलाला मुकावे लागत आहे. दुसरीकडे अधिकृत रीत्या होणारा वाळू उपसा जरी थांबला असला तरीही माफियांनकडून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी मुंब्रा खाडीत रेतीचा दिवसाढवळ्या अवैध उपसा करणाऱ्या माफियांविरुद्ध जिल्हा महसूल अधिकारी कारवाई करिता गेले असता, त्यांच्यावर माफियांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक थोडक्यात बचावले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाळू माफिया विरोधात सातत्याने धडक कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने भरारी पथकांची स्थापना करण्यात आली होती.

हेही वाचा : घोडबंदर रस्त्याचे रुंदीकरण ठाणे, परिसरासाठी महत्त्वाचे का? भविष्यात कोणते फायदे अपेक्षित?

पाच ते सहा महिन्यांपूर्वी या भरारी पथकांची स्थापना करत खाडी आणि नदीपात्रातून अवैध पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्या माफी आणि विरोधात धडक कारवाई सत्र जिल्हा प्रशासनाने सुरू केले होते. यामुळे वाळू माफियांचे देखील धाबे चांगलेच दणाणले होते. दरम्यानच्या काळात अवैध वाळू उपसा पूर्णपणे थांबल्याचे दिसून आले होते. अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीनंतरच या भरारी पथकांची कारवाई थंडावल्याचे दिसून येत आहे. याचाच फायदा घेत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून रेतीचा उपसा करणारे माफिया टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली असून त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे.

हेही वाचा : ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तिकीट तपासणी

वाहतूक देखील तातडीने

बार्ज, बोटी, सक्षम पंप यांच्या साह्याने दिवसाढवळ्या वाळू माफियांकडून खाडीपात्रातून अवैध पद्धतीने उपसा सुरू आहे. तर यातून वाळू उपसा केल्यावर अनेकदा किनारी छोट्या कुंड्या उभारून त्यात गोळा करत असत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून या कुंड्या लक्ष्य केले जात असल्याचे कळून येताच माफियानी आता उपसा केलेली वाळू लागलीच किनारी उभे असलेल्या डंपर मधून तातडीने वाहून नेण्यास सुरुवात केली आहे. रात्री तसेच दिवसा देखील असे प्रकार सर्रास होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या कडे जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने माफियांचे चांगलेच फोफावत आहे.

“वाळू माफियांकडून होणारा अवैध उपसा रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून नियमित स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे.” – गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), ठाणे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane district illegal sand mining day and night by sand mafia due to police inaction css