ठाणे : आरटीई अंतर्गत होणाऱ्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ठाणे जिल्ह्यातून प्रतिक्षा यादीतील २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी आतापर्यंत केवळ ६३६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले असल्याची माहिती समोर आली आहे. २४ मार्च पर्यंत प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. परंतू, अद्याप २ हजार ६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले नाही. कागदपत्रांच्या कमतरते अभावी प्रवेश घेण्यास पालकांना विलंब होत असल्याचा दावा पालक संघटनेकडून केला जात आहे.
वंचित, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या २५ टक्के आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी १४ जानेवारीपासून सुरुवात झाली. हे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर, प्रवेश अर्ज स्विकारण्याची मुदत २ फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली. त्यानुसार, १४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे आरटीई प्रवेशासाठी अर्ज प्राप्त झाले.
त्यापैकी १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी १० मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू, १० मार्चपर्यंत केवळ ६ हजार ७२१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले. त्यामुळे आठवड्याभरातच प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. त्यानुसार, पहिल्या प्रतिक्षा यादीमधून २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २४ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली.
परंतू, २४ मार्च रोजी दुपारपर्यंत यापैकी केवळ ६३६ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले असल्याची माहिती आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तर, पालक संदेश पाहत नसल्यामुळे त्यांना आपल्या पाल्याची आरटीई मध्ये निवड झाली आहे हे समजत नसल्यामुळे काही पालक प्रवेश निश्चित करण्यासाठी अद्याप आलेले नाहीत, असा दावा प्राथमिक शिक्षणविभागाकडून करण्यात आला आहे.
पालकसंघटनेची प्रतिक्रिया…
आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २४ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे ही माहिती अद्यावत केलेली नाही. यावर अजूनही पहिल्या यादीच्या प्रवेशासाठी दिलेली शेवटची तारीख १० मार्च दाखवत आहे. त्यामुळे याविषयी पालक अनभिज्ञ असावे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई शहरातील शिक्षण आरोग्य अधिकारी मंच चे अध्यक्ष प्रकाश दिलपाक यांनी दिली. तर, ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, त्या विद्यार्थ्यांकडे काही कागदपत्रांची कमतरता असल्याचे समजत आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा अद्याप प्रवेश झालेला नसल्याची माहिती ठाण्यातील एका पालक संघटनेकडून देण्यात आली.
प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
आरटीई २५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १ मधील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी १ एप्रिल पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. या फेरीसाठी ही अंतिम मुदतवाढ असून याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.