कल्याण : नागरिकांच्या तक्रारी आणि प्रश्न सोडविण्यावर सर्वाधिक भर द्यावा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपुर्वी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशानंतर राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा विभागाने जिल्ह्यात शरद संपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ही माहिती बुधवारी कल्याणमध्ये माध्यमांना दिली. ३० सप्टेंबरला मुरबाड तालुक्यातील माळ गटातून तर, १ ऑक्टोबरला वैशाखरे गटातून संपर्क अभियानाला सुरूवात होईल, असे तपासे यांनी सांगितले. वैशाखरे गटातील अभियानाला राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी दीपक वाकचौडे, नामदेव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरूवात केली जाणार आहे.
आमदार रोहित पवार यांनी कल्याण, उल्हासनगर भागाचा दौरा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर झाली आहे. शिवसेना-भाजपला राजकारण करायचे आहे. आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि यापूर्वी सोडविले आहेत. त्यामुळे लोक आपल्या बरोबर आहेत, असा कानमंत्र आमदार पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. हा सल्ला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण, शहरी भागात राष्ट्रवादी काँग्रेसने संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे गाव, आदिवासी भागातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.
हेही वाचा : कल्याणमध्ये हाॅटेलच्या रोखपालाला बेदम मारहाण; हाॅटेलच्या मालमत्तेचे नुकसान
तसेच या भागातील रस्ते, वीज, पाणी आणि इतर नागरी समस्यांची माहिती घेतली जाणार आहे. हे प्रश्न शासनस्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजप नेत्यांना आता सामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळच नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर नागरिक नाराज आहेत, असा दावाही तपासे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बाहेर पडून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देऊन अजित पवार यांनी फुटीचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक निष्ठावान कार्यकर्ते नाराज आहेत. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे किती कार्यकर्ते, पदाधिकारी अजित पवार यांच्या सोबत आहेत याचीही चाचपणी या अभियानाच्या माध्यमातून केली जाणार आहे. शरद पवार यांचे विचार, त्यांनी मागील ५५ वर्षांत केलेली विविध प्रकारची विकास कामे, राजकीय, सामाजिक क्षेत्रात केलेले काम ही माहिती सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवली जाणार आहे, असे तपासे म्हणाले.