कल्याण : शासन मान्यता विश्व विद्यालयाच्या माध्यमातून परिचारिका प्रशिक्षण देतो, असे सांगून ‘उडाण’ संस्थेने मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील ३८ विद्यार्थिनींकडून तीन वर्षांपूर्वी दीड ते तीन लाखांपर्यंतचे प्रशिक्षण शुल्क घेतले. परंतु संस्थेने या विद्यार्थिनींना जनरल नर्सिंग मिडवाईफरी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्याऐवजी रुग्ण सेवा प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देऊन फसवणूक केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या संस्थेने ३८ विद्यार्थिनींकडून मागील तीन वर्षांत सेवा शुल्काच्या माध्यमातून प्रत्येकी १ लाख ७५ हजार ते दोन लाखांहून अधिकची रक्कम वसूल केली आहे. फसवणुकीची एकूण रक्कम ५२ लाख २१ हजार रूपये इतकी आहे. उडाण संस्थेने खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा आरोप करत विद्यार्थिनींनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रिध्दी इंदुलकर ही विद्यार्थिनी या प्रकरणात तक्रारदार आहे. उडाण संस्थेचे संचालक वरूण झा, राहुल झा आणि संस्था शाखा प्रमुख प्रिती सोरटे यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : कल्याण : शिळफाटा रस्त्यावर सैंधव मीठ विकणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कोंडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रिध्दी इंदुलकर हिच्यासह ३८ विद्यार्थिनींना रुग्ण सेवा देणाऱ्या जनरल नर्सिंग मिडवाईफरी (जीएनएम) हा तीन वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम पूर्ण करायचा होता. तिला ऑनलाईन माध्यमातून कल्याणमध्ये उडाण ही संस्था अशाप्रकारचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी उडाण संस्थेच्या प्रिती सोरटे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी आमची उडाण संस्था दिल्लीतील विश्वकर्मा विद्यापीठाशी संलग्नित आहे. आमचे परिचारिका प्रशिक्षण शासन मान्यताप्राप्त आहे, असे आरोपी झा, सोरटे यांनी सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन ३८ विद्यार्थिनींनी दीड लाखांहून अधिकच्या रकमा भरणा करुन उडाण संस्थेत प्रवेश घेतला.
हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत ‘चला होऊ द्या चर्चा’ सभेला परवानगी नाकारली, डोंबिवलीत ‘उबाठा’चा मूक मोर्चा
पहिल्या वर्षीची परीक्षा दिल्यानंतर गुणपत्रिकेवर ॲडव्हान्स डिप्लोमा इन पेशंट केअर मॅनेजमेंट असे अभ्यासक्रमाचे नाव लिहिल्याचे तक्रारदार रिध्दीच्या निदर्शनास आले. तिने ही बाब संस्थेच्या निदर्शनास आणली. त्यावेळी पहिली दोन वर्ष असेच नाव असेल. तिसऱ्या वर्षीची परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला जनरल नर्सिंग मिडवाईफरी अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळेल, असे संस्था चालकांनी सांगितले. तक्रारदाराने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर विश्वकर्मा विद्यापीठाची माहिती मिळवली. त्यावेळी विश्वकर्मा विद्यापीठ बनावट असल्याचे आढळले.
हेही वाचा : डोंबिवली पूर्वेतील सरकता जिना बंद, प्रवाशांचे हाल
३८ विद्यार्थिनींनी उडाण संस्थेकडून जी. एन. एम. ची तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली. निकालानंतर विद्यार्थिनींना मिळालेली गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रावर ॲडव्हान्स डिप्लोमा इन पेशंट केअर मॅनेजमेंट लिहिलेले आढळले. आरोपी झा, सोरटे यांनी याप्रकरणी उडवाउडवीची उत्तरे दिली. आम्ही भारतीय परिचारिका परिषदेकडे आपली नोंदणी करून देणार नाही, अशी उलट भूमिका घेतली. उडाण संस्थेने खोटी माहिती देऊन आपली शिक्षणाची तीन वर्ष फुकट घालविली. आपले आर्थिक नुकसान केले म्हणून ३८ विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी या विद्यार्थिनींना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.