ठाणे – उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता ठाणे जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि माध्यमांच्या शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. १ एप्रिल पासून हा बदल लागू करण्यात आला असून प्राथमिक शाळांसाठी सकाळी ७ ते ११.१५ वेळापत्रक तर, माध्यमिक शाळांसाठी सकाळी ७ ते ११.४५ वेळापत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती ठाणे जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या तापमान वाढीचा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. वाढत्या तापमानात नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे शालेय विद्यार्थ्यांचा हा परिक्षेचा कालावधी सुरु आहे. परिक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना शालेला सुट्टी लागते. परंतू, नव्या शैक्षणिक धोरणानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काही वर्ग हे सीबीएसई पॅटर्ननुसार एप्रिल महिन्यापासू सुरु होणार आहे. एप्रिल महिन्यात तीव्र उष्णता असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून शाळेच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये प्राथमिक विभागाच्या शाळांसाठी सकाळी ७ ते ११.१५ तर, माध्यमिक विभागाच्या शाळांसाठी सकाळी ७ ते ११.४५ असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची काळजी कशी घ्यावी ?
उन्हाळ्यात विद्यार्थ्यांच्या मैदानी आणि शारीरिक हालचाली टाळाव्यात, विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे आणि वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करावी असे आवाहन शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना करण्यात आले आहे. राज्यात वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी शाळेतील वेळेत बदल करण्यात आले असून शिक्षक आणि पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी केले आहे.