ठाणे : लोकसभा निवडणूकांमध्ये तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर राष्ट्रवादीने (शरद पवार गट) निवडणूक लढविली होती. परंतु या निवडणूकीमध्ये ‘तुतारीवाजविणारा माणूस’ या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिन्हासोबत ‘ट्रम्पेट’ या चिन्हाला देखील भरमसाठ मतदान झाले. ‘ट्रम्पेट’ला प्रचलित भाषेत ‘पिपाणी’ म्हटले जाते. या पिपाणी चिन्हामुळे शरद पवार गटाला अनेक जागांवर फटका बसला होता. ठाणे जिल्ह्यात आता विधानसभा निवडणूकीसाठी शरद पवार गटाने पाच उमेदवार उभे केले आहेत. या पाचही उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आता पिपाणीमुळे तुतारी वाजविणाऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभेच्या जागा आहेत. महाविकास आघाडीने येथील मुंब्रा-कळवा, शहापूर, उल्हासनगर, बेलापूर आणि मुरबाड या मतदारसंघात महायुतीसमोर उमेदवार उभे केले आहेत. यातील मुंब्रा कळवा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड, शहापूर मतदारसंघातून पांडुरंग बरोरा, उल्हासनगर मतदारसंघातून ओमी कलानी, बेलापूरमधून संदीप नाईक तर मुरबाड मतदारसंघातून सुभाष पवार हे निवडणूक लढवित आहेत.
लोकसभा निवडणूकीत अनेक ठिकाणी पिपाणी या चिन्हावर अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित होते. या निवडणूकांमध्ये पिपाणी चिन्हावरील उमेदवारावर हजारांच्या घरात मतदान झाले होते. काही दिवसांपूर्वीच फलटणमधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आमच्या छत्रपतींना (उदयनराजे भोसले) ‘पिपाणी’ने वाचविले असे म्हटले होते. या लोकसभा मतदारसंघात ट्रम्पेट या चिन्हावर ३७ हजारांचे मतदान झाले होते. इतर अनेक मतदारसंघामध्ये अशीच परिस्थिती होती.
विधानसभा निवडणूकीमध्येही जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या पाचही उमेदवारांपुढे पिपाणीने डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता प्रचाराच्या माध्यमातून उमेदवार, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना पिपाणी आणि तुतारी वाजविणारा माणूस या दोन्ही चिन्हाचा फरक पटवून द्यावा लागत आहे.
शहापूर मतदारसंघात सुभाष गोटीराम पवार हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे किसन कथोरे निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात सुभाष शांताराम पवार या अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट हे चिन्ह मिळाले आहे.
मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड हे निवडणूक लढवित असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला निवडणूक लढवित आहेत. तर या मतदारसंघात अपक्ष उमेदवार अमीर अब्दुल्ला अन्सारी हे ट्रम्पेट चिन्हावर निवडणूक लढवित आहेत.
बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रफुल्ल म्हात्रे यांना ट्रम्पेट हे चिन्ह मिळाले आहे.
शहापूर मतदारसंघातून पांडुरंग बरोरा हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवित आहेत. तर या मतदारसंघातून रमा बाळू शेंडे उर्फ रुपाली रविकांत आरज यांना ट्रम्पेट चिन्ह मिळाले आहे.
उल्हासनगर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून ओमी कलानी निवडणूक लढवित आहेत. तर या मतदारसंघात सयानी मन्नु या अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट चिन्ह मिळाले आहे.