ठाणे : महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या वितरण प्रणालीमधील पाण्याचे नमुने घेऊन त्याची गुणवत्ता तपासण्यात आली असून यामध्ये पाण्याचे ९३ टक्के नमुने पिण्यायोग्य तर, ७ टक्के नमुने पिण्याअयोग्य आढळून आलेले आहेत. २०२२ मध्ये केलेल्या तपासणीत पिण्यायोग्य पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण ९५ टक्के इतके होते. परंतु गेल्यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये त्यात दोन टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे ठाणेकरांना होणाऱ्या शुद्ध पाण्याची गुणवत्ता कमी होताना दिसून येत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. महापालिकेकडून शहरात दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात.
हेही वाचा…ठाणे : पार्टी करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रांकडून तरूणाला बेदम मारहाण
या स्त्रोतामार्फत होणाऱ्या पाण्याचा पुरवठा शहरात करण्यासाठी ७८० किमी लांबीची वितरण व्यवस्था आहे. पाणी वितरण व्यवस्थेचे तीन भागात विभागणी करण्यात आली असून त्याद्वारे पुढे शहरातील ४४ विभागात पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबई महापालिकेकडून यापुर्वी प्रक्रियेविनाच पाण्याचा पुरवठा केला जात होता. या पाण्याचा ज्या भागांमध्ये पुरवठा होत होता, त्या भागांमधील रहिवाशांमधून पालिकेवर टिका होऊ लागली होती. यानंतर ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेकडून प्रक्रिया केलेले पाणी घेण्यास सुरूवात केली आहे. यामुळे पाणी गुणवत्तेत सुधारणा होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु ठाणे शहरात पाण्याची गुणवत्ता सुधारण्याऐवजी त्यात घसरण झाल्याची बाब पर्यावरण अहवालातून पुढे आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या वितरण प्रणालीमधील पाण्याचे नमुने घेऊन त्याची गुणवत्ता प्रशासनाकडून दरवर्षी तपासण्यात येते. त्याची पर्यावरण अहवालात नोंद करण्यात येते. यंदाच्या पर्यावरण अहवालातही तशी नोंद करण्यात आलेली आहे. २०२०-२१ या वर्षात पाण्याचे एकूण १४ हजार ३०५ नमुने तपासण्यात आले. यामध्ये १३ हजार ७५५ नमुने पिण्यायोग्य तर, ६२० नमुने पिण्या अयोग्य आढळून आले होते.
हेही वाचा…अंबरनाथच्या शिवमंदिरावरील शिल्प निखळले, तज्ज्ञांच्या नाराजीनंतर पुरातत्व खात्याची धावाधाव
त्यावेळी पाणी गुणवत्तेचे प्रमाण ९६ टक्के इतके होते. २०२१-२२ या वर्षात पाण्याचे एकूण १४ हजार ९०५ नमुने तपासण्यात आले. यामध्ये १४ हजार ११७ नमुने पिण्यायोग्य तर, ७८६ नमुने पिण्या अयोग्य आढळून आले होते. त्यावेळी पाणी गुणवत्तेचे प्रमाण ९५ टक्के इतके होते. २०२२-२३ या वर्षात पाण्याचे एकूण १३ हजार ०२४ नमुने तपासण्यात आले. यामध्ये १२ हजार ०९९ नमुने पिण्यायोग्य तर, ९२५ नमुने पिण्या अयोग्य आढळून आले होते. त्यावेळी पाणी गुणवत्तेचे प्रमाण ९३ टक्के इतके होते. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पाण्याचे नमुने कमी तपासण्यात आलेले असतानाही गुणवत्तेचे प्रमाण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येत आहे.