ठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात भारत जोडो न्याय यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ड्रोन उडविण्यास आणि पॅराशूट ग्लायडिंग करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे ड्रोनद्वारे छायाचित्र टिपण्यासाठी निघालेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे.
हेही वाचा : ठाणे : ‘टीएमटी’त सवलतीचे तिकीट देतांना वाहकांची तारांबळ
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये शुक्रवारी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आहे. राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा वर्गवारी आहे. भिवंडीतील अंबाडी नाका परिसर, महापोली गाव परिसर, शेलार हनुमान मंदिर परिसर, नदीनाका शेलार परिसरात राहुल गांधी नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. तर रात्रीच्या वेळेत राहुल गांधी यांच्यासह इतर सहभागी सोनाळे मैदान येथे थांबणार आहे. शनिवारी राहुल गांधी ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरात येणार आहे. कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणांमध्ये पॅराशूट ग्लायडिंग करण्यास तसेच ड्रोन उडविण्यास बंदी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (९) नुसार शुक्रवारी दुपारी १ ते शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत पॅराशूट ग्लायडिंग करण्यास तसेच ड्रोन उडविण्यास बंदी लागू केली आहे.