ठाणे : कापूरबावडी येथील तत्त्वज्ञान विद्यापीठ भागात मद्यपी वाहन चालकाने तीन ते चार वाहनांना धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका महागड्या मोटारीचाही सामावेश आहे. अपघाता प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मद्यपी वाहन चालक कृष्णा गवळे (३०) याला नोटीस बजावली आहे. या अपघातात तीन ते चार वाहनांना धडक दिली असली तरी एकाच वाहन चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
कृष्णा गवळे हा त्याच्या मोटारीने सोमवारी सकाळी घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करत होता. त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील होते. सकाळी ७ वाजताच्या सुमारास तो तत्त्वज्ञान विद्यापीठ परिसरात आला असता, त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्याच्या वाहनाने एका महागड्या मोटारीसह तीन ते चार रिक्षांना धडक दिली. घटनेची माहिती कापूरबावडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कृष्णा गवळे याला ताब्यात घेतले. तर त्याचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले होते. या अपघातात रिक्षांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. तर महागड्या मोटारीच्या मागील बाजूचे आणि दरवाजाचे नुकसान झाले आहे. अपघाताप्रकरणी मोटार चालकाने तक्रार दाखल केल्यानंतर कृष्णा गवळे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातात रिक्षातील काही प्रवासी जखमी झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. परंतु रिक्षा चालक किंवा इतर कोणीही प्रवासी तक्रार देण्यासाठी आले नव्हते, असे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. रिक्षा चालकांना संपर्क साधला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.