ठाणे – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशात लागू झाले असून महाराष्ट्रात त्या अंतर्गत शालेय स्तराचे राज्य अभ्यासक्रम आराखडा सर्वांसाठी खुला झाला आहे. याची माहिती शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ठाण्यात शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्याभारती कोकण प्रांत आणि श्री मावळी मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २६ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत शिक्षण परिषद राबविली जाणार आहे, अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

विद्याभारती कोकण प्रांत आणि श्री मावळी मंडळ, ठाणे यांच्या वतीने मावळी मंडळ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला प्रा. डॉ. श्रीपाद ढेकणे (विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री) मुख्याध्यापक संतोष भणगे (विद्या भारती कोकण प्रांत मंत्री), सुधाकर मोरे (अध्यक्ष, मावळी मंडळ ट्रस्ट), प्रा. डॉ. नरेंद्र पाठक (शिक्षणतज्ज्ञ) आणि प्रदीप पराडकर (विद्या भारती कोकण प्रांत) हे उपस्थित होते.

या शिक्षण परिषदेचे उद्घाटन शनिवार, २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर, शिक्षणात पंचकोष आणि भारतीय शिक्षण मनोविज्ञानाचा आधार या दोन पुस्तकांचे विमोचन होणार आहे. तर, सकाळी ११ वाजता डॉ. श्रीपाद ढेकणे हे उपस्थितांशी संवाध साधणार आहे. तसेच भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर शिक्षणतज्ज्ञ आनंद काटीकर आणि पंचकोश विकास या विषयावर आदित्य शिंदे हे दोघे उपस्थितांना संबोधणार आहेत.

या व्याख्यानानंतर पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय आणि संस्थाचालक आणि पालक या चार वितभागांत चार सत्रे होणार आहेत. यात या धोरणाबाबत त्या त्या विभागाची जबाबदारी याची मांडणी केली जाणार आहे. हे सर्व सत्र पार पडल्यानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रमा होणार आहे. त्यात, पालक, शिक्षक, संस्था तसेच मुख्याध्यापक यांच्याकडून येणाऱ्या प्रश्नांचे निरसन केले जाणार आहे. तसेच या परिषदेचा प्रस्ताव शासनासमोर सादर केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या संपूर्ण परिषदेत ३ ते ८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शिशुवाटीका, पंचकोष आणि संस्कृतमध्ये विज्ञानाची परंपरा याचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. याची १५ मिनिटाची मांडणी असणार आहे. या शिक्षण परिषदेत सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे, त्यासाठी आयोजकांना गुगल फॉर्मची निर्मिती केली आहे. ज्या व्यक्तीची नोंदणी असेल त्या व्यक्तीलाच या परिषदेत सहभागी होता येणार आहे.