ठाणे : ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय पांडे यांनी एका व्यक्तीला मारहाण केली होती. या मारहाणीप्रकरणी रविवारी रात्री त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची (एन.सी.) नोंद करण्यात आली आहे. नागरिकांनी मारहाणीचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर हा मारहाणीचा प्रकार उघडकीस आला आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते ठाण्यात राहात असून त्यांनी घरे पुनर्विकासासाठी संजय पांडे यांच्याकडे दिली होती. पुनर्विकास होईपर्यंत तेथील रहिवाशांना घरभाडे दिले जाते. मागील १४ महिन्यांपासून त्यांना संजय पांडे यांनी घरभाडे दिले नाही. त्यामुळे तक्रारदार आणि त्यांच्यासह त्यांच्या परिसरातील नागरिक रविवारी दुपारी संजय पांडे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी संजय पांडे यांनी रहिवाशांना शिवीगाळ केली. तसेच तक्रारदार यांना मारहाण केली. या मारहाणीचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. तक्रारदार यांनी तात्काळ चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा…अंबरनाथमधील अतिरिक्त एमआयडीसी रस्ते भागात दररोजच्या वाहन कोंडीने प्रवासी हैराण
कोण आहेत संजय पांडे ?
संजय पांडे हे पूर्वी भाजपमध्ये होते. भाजपमधून तिकीट मिळवत त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत ओवळा माजीवडा मतदारसंघातून आमदार प्रताप सरनाईक यांना कडवे आव्हान दिले होते. त्यामुळे प्रताप सरनाईक यांचा निसटता विजय झाला होता. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी त्यांचा पक्ष प्रवेश झाला होता. सध्या ते माजी नगरसेवक आहेत. संजय पांडे हे सध्या शिंदे गटात आहेत.