ठाणे : एकीकडे दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असतानाच, दुसरीकडे ठाणे शहरातील विविध प्रकल्पांसाठी पालिका प्रशासनाने वृक्षतोडीस परवानगी दिली आहे. यामुळे हरीत पट्टा नष्ट होत असल्याबाबत चिंता व्यक्त करत पर्यावरणप्रेमी संस्थांनी शनिवारी दुपारी मानपाडा परिसरात आंदोलन केले. यावेळी पालिकेकडून वृक्षतोडीबाबत राबविल्या जाणाऱ्या धोरणाचा संस्थेच्या प्रतिनिधींनी निषेध नोंदिवला.

ठाणे बोरीवली भुयारी मार्ग, घोडबंदर रुंदीकरण, साकेत आनंदनगर उन्नत मार्गासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जात आहे. या वृक्षतोडीविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहेत. ठाणे -बोरीवली भुयारी मार्गाच्या कामासाठी जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवून हरित पट्टा नष्ट करण्याबरोबरच धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी होत असून यामुळे त्रस्त झालेल्या मानपाडा येथील मुल्लाबाग परिसरातील गृहसंकुलामधील रहिवाशांनी शनिवारी सकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रहिवाशांनी दिला. त्यापाठोपाठ शनिवारी सायंकाळी ठाणे बोरीवली भुयारी मार्ग, घोडबंदर रुंदीकरण, साकेत आनंदनगर उन्नत मार्गासाठी होणाऱ्या वृक्ष तोडीविरोधात पर्यावरण प्रेमी संस्थांनी आंदोलन केले.

घोडबंदर येथील मुख्य आणि सेवा रस्त्यांसाठी होत असलेल्या वृक्षतोडीकडे लक्ष वेधण्यासाठी पर्यावरण प्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींनी मानपाडा चौकात आंदोलन केले. हरित क्षेत्र वाचवा, वृक्ष तोड थांबावा अशी मागणी संस्थेच्या प्रतिनिधींनी यावेळी केली. या आंदोलनात म्यूज फाउंडेशन, फ्रायडेज फॉर फ्युचर, फ्रेंड्स ऑफ लडाख आणि फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ठाणे महापालिकेच्या हरित क्षेत्राबाबतच्या उदासीनतेविरोधात संस्थांनी शांततापूर्ण निदर्शने केली. गेल्या काही वर्षांत पालिकेने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीस परवानगी दिली आहे. याबाबत आंदोलनात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली.

पर्यावरणप्रेमींची मागणी

ट्री अथॉरिटी कमिटीने कमिटी सदस्यांची नावे, संपर्क आणि तपशील अशी माहिती तात्काळ संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. वॉर्डनिहाय वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांचे तपशील तसेच वृक्षतोड, छाटणी, स्थलांतर यासाठी दिलेल्या परवानग्यांचे तपशील, स्थान, कालावधी, बजेट, भरपाई स्वरूपातील वृक्षारोपण यासह जुनी माहिती न हटवता उपलब्ध ठेवावी. सर्व वृक्षांचे जिओ-टॅग केलेले माहिती द्यावी. स्थलांतरित्त आणि भरपाई स्वरूपातील वृक्षांची जिओ-टॅग माहिती, वृक्षांची स्थिती, प्रजाती, पाण्याचा स्रोत याची छायाचित्रांसह माहिती द्यावी. ट्री अथॉरिटीच्या बैठकीचे इतिवृत्त विशेषतः वृक्षतोड किंवा स्थलांतरास मान्यता किंवा नकार दिल्याबाबतच्या चर्चा याबाबत माहीती द्यावी. याशिवाय, नागरिकांच्या तक्रारींसाठी सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आलेला हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा, ज्यासाठी निश्चित उत्तर वेळसुद्धा संकेतस्थळावर नमूद असावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी यावेळी केली.