ठाणे : आधारकार्डचा गैरवापर होत असल्याचे सांगत काही भामट्यांनी एका लूम कामगाराची व्हिडीओ काॅल करत तसेच एक ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करायला सांगून एक लाख ७५ हजार ८०४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक करण्यासाठी भामट्यांनी पोलिसांची वर्दी आणि मुंबई पोलिसांच्या चिन्हाचा वापर केला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी असे आणखी काही प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : कल्याणमध्ये पदपथावर आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाचे अपहरण, पोलिसांनी केली दोन जणांना अटक
भिवंडी येथील कामतघर भागात ४४ वर्षीय लूम कामगार वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एका व्यक्तीने संपर्क साधला. तुमचे पार्सल असून ते रिटर्न झाले आहे असे सांगितले. लूम कामगाराने आपले कोणतेही पार्सल नसल्याचे सांगत काॅल ठेवला. त्यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा संपर्क साधत पार्सलवर आधारकार्डचा तुमचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक असल्याचे सांगितले. तुमचे पार्सल नसेल तर तुम्ही पोलिसांकडे तक्रार करा. माझ्याकडे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचा (गुन्हे अन्वेषण शाखा) अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक असल्याचे सांगितले. या ठगावर लूम कामगाराचा विश्वास बसला. त्यानंतर त्या ठगाने त्यांना मोबाईलमध्ये एक ॲप सामाविष्ट करण्यास सांगितले. ते ॲप मोबाईलमध्ये घेतल्यानंतर भामट्याने समूह व्हिडीओ (ग्रुप) काॅल केला. त्या व्हिडीओ काॅलमध्ये एक व्यक्ती पोलिसांच्या वर्दीमध्ये होता. त्या व्यक्तीच्या मागे मुंबई पोलीस दलाचे चिन्ह होते. त्या व्यक्तीने लूम कामगाराला एका ॲपच्या माध्यमातून बँकेतील पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार लूम कामगाराने त्याच्या खात्यातील १ लाख ७५ हजार ८०४ रुपयांची रक्कम त्याच्या खात्यात पाठविली. त्यानंतर त्या भामट्यांनी संपर्क बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कामगाराने याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.