ठाणे : देशातील प्रसिध्द लेखक आनंद नीलकांतन यांना धमकी दिल्याचा तसेच त्यांच्याकडून १० लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात आनंद नीलकांतन यांची अनेक पुस्तके सर्वाधिक वाचक पसंतीची आहेत.
हेही वाचा : डोंबिवली रेल्वे स्थानकात दुचाकींचे बेकायदा वाहनतळ; प्रवाशांना स्थानकात येजा करताना अडथळे
आनंद नीलकांतन हे ठाण्यात राहतात. पौराणिक साहित्य लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच ते स्तंभलेखन देखील करतात. त्यांचे “वाल्मिकी इज वूमन- फाईव्ह टेल्स ऑफ रामायण” नावाचे इंग्रजी भाषेतील पुस्तक आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना रविंद्र चौधरी नावाच्या एका व्यक्तीने संपर्क साधला. या पुस्तकातून एका समाजाचा अपमान केला असल्याचे त्या व्यक्तीने आनंद यांना सांगितले. तसेच त्यांना धमकावून त्यांच्याकडून १० लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.