ठाणे : येथील श्रीनगर भागातील गंगा विहार या तळ अधिक चार मजली इमारतीच्या तळ मजल्यावरील नित्यानंद लॉन्ड्री दुकानात रविवारी पहाटे आग लागली. आगीमुळे इमारतीमध्ये धूर पसरल्याने सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीमधील २५० रहिवाश्यांना अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यानी सुखरूप बाहेर काढले. तसेच तासाभरात ही आग पूर्णपणे शमविली. मदत यंत्रणेच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

ठाणे येथील श्रीनगर भागात गंगा विहार ही तळ अधिक चार मजली इमारती आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर नित्यानंद लॉन्ड्री नावाचे दुकान आहे. या दुकानात रविवारी पहाटे ५ वाजता आग लागली. ही माहिती दुकान मालक बहादुर बेनी यांनी देताच वागळे इस्टेट विभाग अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. आगीमुळे इमारतीत सर्वत्र धूर पसरला होता.

हेही वाचा : स्बळाच्या नाऱ्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टिकेचे बाण

गंगा विहार या चार मजली इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर १२ सदनिका आहेत. तसेच संपूर्ण इमारतीत एकूण ४८ सदनिका आहेत. त्यामध्ये अंदाजे २५० रहिवासी राहतात. पहाटेची वेळ असल्याने नागरिक घरात झोपलेले होते. आग लागून इमारतीमध्ये सर्वत्र धूर पसरल्याने सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीमधील २५० रहिवाश्यांना अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यानी सुखरूप बाहेर काढले. आगीत नित्यानंद लॉन्ड्री मधील इस्त्री, लाकडी कपाट, कपडे, विद्युत वायरिंग इतर साहित्य जळून नुकसान झाले आहे. तसेच या गाळ्यामध्ये असलेले तीन व्यवसायिक सिलेंडर सुरक्षेतेच्या कारणास्तव अग्निशमन दलाने ताब्यामध्ये घेतले आहेत. आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून ६ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

Story img Loader