ठाणे : जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ठाण्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्हातील ज्या बालकांची पहिल्या यादीमध्ये निवड झालेली आहे, अशा बालकांच्या पालकांनी १३ ते २५ एप्रिलपर्यंत पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले.
ज्या बालकांची पहिल्या यादीमध्ये निवड झाली आहे, अशा बालकांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस ही आला असेल. त्यांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका अथवा महापालिकेच्या पडताळणी केंद्रावर जाऊन प्रथम पडताळणी समितीकडून पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी ३० एप्रिलपर्यंत शाळेमध्ये जाऊन बालकांचा प्रवेश घ्यावा. तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करावीत.
प्रवेशाची खात्री करावी
प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाइलवर एसएमएस प्राप्त झाले असतील. परंतु, फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली आहे अथवा नाही, याची खात्री करून घ्यावी आदी सूचना शिक्षण विभागाने पालकांना दिल्या आहेत. तसेच प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका / मनपा कार्यक्षेत्रातील सक्षम अभियांशी संपर्क साधावा असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.