ठाणे: जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांना त्यांचे वनपट्ट्यांचे वाटप करण्यात यावे यासाठी मागील दोन आठवड्यांपासून श्रमजीवी संघटनेच्या वतीने आंदोलन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बुधवारी ९०५ वन हक्क दावेदारांना वनपट्यांचे वाटप केले. तसेच उर्वरितांची कागदपत्रांची पडताळणी सुरु असून त्यांना देखील तातडीने वन हक्क दाव्याचे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या आदिवासी नागरिकांची संख्या मोठी आहे. या आदिवासी नागरिकांकडून गेली अनेक वर्ष शासनाच्या जमिनी राखण्याचे काम केले जात आहे. यासाठी त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून वन हक्क दावा प्रमाणपत्रांचे अर्थातच वनपट्ट्यांचे वाटप करण्यात येते. मात्र अनेकदा आदिवासी नागरिकांना त्यांचे वनपट्टे मिळत नसल्याने प्रशासनाविरुद्ध त्यांना त्यांच्या हक्काच्या प्रमाणपत्रासाठी संघर्ष करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर ठाणे तालुक्यातील आदिवासी नागरिकांना त्यांच्या हक्काचे वन हक्क दाव्यांचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने मागील दोन आठवड्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होते. याच आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बुधवारी ९०५ वन हक्क दावेदारांना वनपट्यांचे वाटप केले.

हेही वाचा : ठाणे, बदलापुरात गोंधळ; ठाण्यात प्रक्रियेवर आक्षेप, तर निरीक्षकांसमोरच बदलापुरात वाद

एकही चुकीचा दावा पात्र नको आणि एकही पात्र होणारा दावा अपात्र होवून कुणावर अन्यायही नको, अशी भूमिका श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी आधीच स्पष्ट केली होती. त्याप्रमाणे पूर्ण तपासणी अखेर ९०५ दावेदार पात्र करून त्यांना वन पट्टे वाटप करण्यात आले. काही कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ५०१ दावे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या पूर्ततेची पूर्ण संधी आदिवासी वन हक्क दावेदाराला मिळावी, या भूमिकेतून प्रशासन त्या दाव्याबाबत देखील लवकरच निपटारा करण्याची सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी स्पष्ट केले.