ठाणे : महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने ४२७ कोटी रुपयांच्या अनुदानांची मागणी पालिका प्रशासनाकडे केली असली तरी प्रत्यक्षात मात्र पालिका प्रशासनाने निम्म्याहून कमी म्हणजेच दोनशे कोटींचे अनुदान देण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत तर, महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत देण्याचे जाहीर करत महिलांसाठी बसगाड्यांमधील डाव्या बाजूकडील आसने आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ३६४ बसगाड्या आहेत. त्यापैकी उपक्रमाच्या स्वत:च्या १२४ बसगाड्या आहेत. तर, उर्वरित २२० बसगाड्या ठेकेदारामार्फत जीजीसी तत्वावर चालविण्यात येत आहेत. एकूण ३६४ पैकी ३०० बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत. ठाणे शहराची लोकसंख्या मागील काही वर्षांपासून वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या २० ते २५ लाखांच्या घरात गेली आहे. असे असले तरी प्रवासी संख्येच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या अपुरी आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका तसेच परिवहन प्रशासनाने बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला असून त्याचबरोबर प्रवाशांना चांगली सोयीसुविधा मिळावी, यावर लक्ष केंद्रीत आले आहे.
हेही वाचा : कल्याणमधील गुटख्याचं गुजरात कनेक्शन; ३० लाखांचा साठा दुर्गाडीजवळ जप्त
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने अर्थसंकल्पामध्ये ४२७ कोटी १८ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी पालिकेकडे केली होती. परंतु पालिका प्रशासनाने केवळ दोनशे कोटींचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. टिएमटीच्या ताफ्यात पर्यावरणपुरक बसगाड्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू असून यातूनच खरेदी करण्यात आलेल्या १२३ विद्युत बसगाड्या टिएटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आणखी ८६ विद्युत बसगाड्या टिएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. याशिवाय, पीएम-ई योजनेतून १०० बसगाड्या टिएमटीला मिळणार आहेत. यामुळे टिएमटीच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या ६०० च्या आसपास होणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
हेही वाचा : कल्याण डोंबिवली पालिकेतील ४२ बालवाड्यांना निकृष्ट खेळण्यांचा पुरवठा; शिक्षिकांच्या तक्रारी
टिएमटीच्या बसगाड्या जीसीसी तत्वावर चालविण्यात येतात. यामध्ये ठेकेदाराला प्रति किलोमीटर प्रमाणे देयक देण्यात येते. परंतु घनकचरा विभागाप्रमाणेच याठिकाणी ठेकेदाराकडून देण्यात येणारी बस सुविधेच्या आधारे देयक देण्याचा विचार पालिका करित आहे. यामध्ये बसगाड्या स्वच्छ आहेत का, प्रवाशांना वेळेत उपलब्ध होतात का, बसगाड्या स्वच्छ आहेत का आणि प्रवाशांना चांगली सुविधा मिळते का, याचा विचार करून देयके दिली जाणार आहेत.