ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलावर मंगळवारी रिक्षा आणि कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला. धीरजकुमार मेहता (४२) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव असून त्यांच्या दोन्ही पायाला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या अपघातामुळे घोडबंदर परिसरात काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात येथील सुरतच्या दिशेने कंटेनर वाहतुक करत होता. हा कंटेनर मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घोडबंदर मार्गावरील पातलीपाडा उड्डाणपूलावर आला. त्यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे या कंटेनरची समोरील रिक्षाला धडक बसली. या अपघातात रिक्षाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच, ठाणे वाहतुक पोलीस, कासारवडवली पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातात रिक्षा चालक धीरजकुमार मेहता यांच्या दोन्ही पायाला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली. अपघातामुळे परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे ठाणे, घोडबंदरहून मिरा भाईंदर, वसई आणि गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. पथकांनी अपघातग्रस्त कंटेनर आणि रिक्षा ही वाहने हायड्रा या यंत्राच्या साहाय्याने बाजुला करण्यात आली.