ठाणे : ठाण्यातील उद्योजकांना माथाडी संघटनांच्या नावाने गुंडांचा खंडणीसाठी होणारा त्रास कदापि खपवून घेतला जाणार नाही आणि त्याविरोधात तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत, असे ठाण्याचे सह पोलिस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उद्योजक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ठाणे पोलिसांची असून कोणतीही घटना घडल्यास ११२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी नुकतीच ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी तसेच शहरातील इतर उद्योजक संस्थेच्या सदस्यांसोबत बैठक घेतली. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख,पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज सिरसाठ , वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्सचे मानद महासचिव भावेश मारू यांनी प्रास्ताविक करतांना संस्थेबद्दल माहिती दिली. उपाध्यक्ष आशिष शिरसाट यांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी सांगितल्या. कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे यांनी ठाणे जिल्ह्यातील व शहरातील उद्योगांची माहिती दिली. निखिल सुळे, कीर्ती पांचाल, अंजुम काझी आणि समिती सदस्यांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी बाबत माहिती दिली.
गुंडांचा त्रास खपवून घेतला जाणार नाही
ठाण्यातील उद्योजकांना खंडणीच्या माध्यमातून त्रास देत असेल तर ते जराही सहन केले जाणार नाही. तसेच माथाडी कामगारांकडून अशा पद्धतीचे वर्तन होत असेल तर त्याबाबत निश्चितच दखल घेतली जाईल. ठाण्यातील उद्योजकांना सुरक्षित आणि उद्योग वाढीसाठी योग्य वातावरण निश्चितच देऊ. माथाडी संघटनांच्या नावाने गुंडांचा खंडणीसाठी होणारा त्रास कदापि खपवून घेतला जाणार नाही आणि त्याविरोधात तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत, असे सह पोलीस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उद्योजकांना आश्वासित केले.
हेल्पलाईन क्रमांक
ठाणे ही उदयोग नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या शहराची संख्या झपाट्याने वाढत आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागूनच असलेले ठाणे हे महत्त्वाचे शहर असून, ठाण्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रामुख्याने ठाणे पोलिसांची आहे. उद्योजक आणि व्यापारी यांच्याशी सातत्याने सुसंवाद घडवून त्यांच्यामध्ये एक विश्वासार्हता निर्माण करण्यात येईल. ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन सारख्या क्रियाशील संघटनेने उद्योजकांमध्ये जागृती निर्माण करावी आणि कोणतीही घटना घडल्यास त्याबाबत संबंधित पोलिसांच्या 112 क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष निदर्शनास आणावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.
शंभर दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत बैठक
शहरातील विविध प्रकारच्या उदयोग आणि व्यावसायिक अस्थापना यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, गुंतवणुक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी चालना देणे, शाश्वत विकासासाठी स्थानिक पातळीवर विश्वासहर्ता वाढविणे, विविध क्षेत्रातील गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेणे, उद्योजक आणि पोलिस यांच्यामध्ये नियमित सुसंवाद साधणे यासाठी “पोलीस, उद्योजक सुसंवाद कार्यक्रम” आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत “ ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स” आणि ठाणे पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.