ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सोमवारी महापालिका शाळांमधील १४ आणि खासगी शाळांमधील ५ अशा १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात सोमवारी पार पडलेल्या कार्यक्रमात माजी महापौर मिनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांवर पडणाऱ्या अतिरिक्त कामांचा उल्लेखही करत माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक केले. समाजातील शिक्षकाचे स्थान अबाधित असून त्यांचे कार्य खूपच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनीही सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षण ही समाजाची प्राथमिक गरज आणि प्रशासनाचे आद्यकर्तव्य आहे, असे प्रतिपादन रोडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात शिक्षणतज्ज्ञ अनिल गुंजाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी सद्यस्थितीतील शिक्षण पद्धती आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत शिक्षकांनी सर्वस्तरातील विद्यार्थ्यांना उत्तम माणूस घडविण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करण्याबाबत विवेचन केले. ती आजच्या काळाची गरज असल्याचे सांगत, त्यासाठी शाळा, शिक्षक आणि शिक्षणपद्धती कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : भिवंडी पालिकेच्या ताफ्यात लघु अग्निरोधक वाहने दाखल

त्यांनी ओघवत्या शैलीत शिक्षकांना जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव करून दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले. यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तर, गटाधिकारी संगीता बामणे यांनी संयोजन केले. कार्यक्रमाच्या सुरूवातील शाळा क्र. ६४ मधील विद्यार्थीनींनी स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गट प्रमुख प्रेरणा कदम, सविता चौधरी, सुरेश पाटील यांनी केले. तर, नुतन बांदेकर यांनी आभार मानले.

हेही वाचा : कल्याणमधील तरूणीची ८८ हजारांची फसवणूक

पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे

सुनिल यशवंत साळूंखे, प्रणोती प्रविण जाधव, राजमल गरमल चव्हाण, सुजाता अशोक रोकडे, संगिता रघुनाथ बोरसे, प्राची गिरीष साळवी, मीना विश्वनाथ म्हात्रे, अनघा अनिरूध्द कोयंडे, संतोष नारायण दळवी, सुनिता सुनिल सरोदे, आशा प्रकाश पवार, दिपा दिपराज पावसकर, यास्मिन रज्जाक अलीशेख, अकिल अहमद शेख, सिम्मी जुनेजा, शारदा अशोक फडतरे, मारुती सुभाना सोलनकर, फरहाना फिरोज शेख, माधुरी गंगाधर भोगे या शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane ideal teaching award given to 19 teachers from municipal and private schools css
Show comments