ठाणे : सुरक्षेच्या दृष्टिने उड्डाणपूलाखाली वाहनतळ किंवा वाहने उभी करण्यास बंदी असतानाही ठाणे शहरातील कापूरबावडी, माजिवडा, मीनाताई ठाकरे चौक येथील उड्डाणपूलाखाली वाहनतळ, बेकायदा टपऱ्या, रिक्षा थांबा थाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरू असताना प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
उड्डाणपूलाखाली घातपात होऊ नये तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने उड्डाणपूलांखाली वाहनतळ किंवा इतर व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. ठाणे शहरात वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा तसेच शहरातील अंतर्गत भागातील तीन पेट्रोल पंप, नौपाडा आणि मिनाताई ठाकरे चौकात उड्डाणपूल उभारले आहेत. हे उड्डाणपूल आता बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आणि वाहने उभी करणाऱ्यांसाठी आश्रय ठरू लागले आहे. माजीवडा येथील नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या उड्डाणपूलाखाली वाहन दुरूस्तीच्या टपऱ्या थाटण्यात आल्या आहेत. या उड्डाणपूलाखाली मोठे ट्रक, टेम्पो, रिक्षा, डम्पर, बसगाड्या यांची दुरूस्ती देखील करण्यात येत आहे. भंगार व्यवसायिकांनीही या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल घाणीचे साम्राज्य बनलेला आहे. तीन पेट्रोल पंप येथील वंदना एसटी थांबा परिसरात उड्डाणलाखाली रिक्षा थांबा तयार करण्यात आलेला आहे. भंगारावस्थेत असलेल्या रिक्षाही येथे पडून आहेत. परिसरातील हाॅटेलमध्ये भोजनासाठी येणारे नागरिकही त्यांची चारचाकी वाहने या उड्डाणपूलाखाली उभी करत असतात.
हेही वाचा : घाटकोपर – डोंबिवली प्रवासात रिक्षेत विसरलेला बारा लाखांचा सोन्याचा ऐवज महिलेला परत
मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपूलाखाली वाहने, शाळेच्या बसगाड्या, तीन चाकी टेम्पो उभे केले जात आहेत. या वाहनांने उड्डाण पुलाखालून बाहेर पडतात किंवा आतमध्ये जातात, त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांनाही अडथळा निर्माण होतो. बिनदिक्कतपणे बेकायदेशीरपणे उभ्या केल्या जाणाऱ्या या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : ठाण्यात परिवहन उपक्रमांकडून प्रवाशांची पळवापळवी
उड्डाणपूलाखाली बेकायदा टपऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. ठाणे महापालिकेने सर्वंकष स्वच्छता अभियान हाती घेतले असून त्याअतंर्गत याठिकाणी कारवाई करण्यात येईल. याशिवाय, इतर ठिकाणी असे असेल तर तिथेही कारवाई करून तो परिसर स्वच्छ केला जाणार आहे. – शंकर पाटोळे, उपायुक्त, ठाणे महापालिका.