ठाणे : दोन ट्रकमधून परवानगीपेक्षा जास्त मेंढ्या आणि बकऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील दाटीवाटीमुळे दोन बकऱ्यांचा मृत्यु झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी दोन्ही ट्रक चालकांना पोलिसांनी अटक केली आहे.

हम्तीयाज अब्दुल मुलतानी (४७) आणि मुलतानी शरिफ गफुर (३१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा ट्रक चालकांची नावे आहेत. हे दोघे गुजरात राज्यातील अरोली जिल्ह्यातील चांँदटेकडी गावचा रहिवाशी असून दोघेही ट्रक चालकाचे काम करतात. हे दोघे गुजरात ते मुंबईतील देवनार कत्तलखाना येथे बकऱ्यांची ट्रकद्वारे वाहतूक करतात. अशाचप्रकारे ते शुक्रवारी सकाळी अशाचप्रकारे दोन ट्रकमधून मेंढ्या आणि बकऱ्यांची वाहतूक करीत होते. या गाड्यांमध्ये बकऱ्या आणि मेंढ्यांनी भरगच्च भरलेल्या होत्या. हे ट्रक घोडबंदर मार्गे जात असताना राहुल पाचपुते या नागरिकाने याने दोन्ही ट्रक रोखून धरले.

प्राणीप्रेमी मित्र संस्था आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि त्यानंतर पोलिसांनी दोन्ही ट्रक कासारवडवली पोलिस ठाण्यात नेले. तिथे पोलिसांनी दोन्ही ट्रक चालकांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गुजरात येथून मुंबईतील देवनार कत्तलखाना येथे बकऱ्या घेऊन जात असल्याची माहिती दिली. पोलिसांनी या दोघांकडे बकरे वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी परवाने दाखविले. यानुसार, एका ट्रकमधून १५० मेंढ्या, बकरे वाहतूकीस परवानगी होती. मात्र, कांदिवली येथील रघुवीर मानवता चॅरिटेबल ट्रस्ट ॲनिमल वेल्फेअर ऑर्गनयझेशन संस्थेच्या प्रतिनिधी जुई कुडतरकर आणि पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी पोलिसांनी ठाणे जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधिकारी विवेक जाधव यांना बोलावून घेतले आणि ट्रकमधील बकऱ्यांची मोजणी करण्याबरोबरच त्यांची तपासणी सुरू केली. यामध्ये एका ट्रकमध्ये २३४ बकऱ्या आणि मेंढ्या दाटीवाडीने भरलेल्या आढळून आल्या आणि त्यातील दोन बकऱ्यांचा मृत्यु झाल्याचे आढळून आले. तर, दुसऱ्या ट्रकमध्ये १७८ बकऱ्या आणि मेंढ्या आढळून आल्या. एकूणच दोन्ही ट्रकमध्ये परवानगी पेक्षा जास्त बकऱ्या भरून त्यांना पुरेशी हवा, हालचाल करण्यास जागा नव्हती. त्यांना चारापाणी, औषधांची व्यवस्था करण्याऐवजी क्रुर वागणुक दिली. याप्रकरणी जुई कुडतरकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही ट्रक चालकांना अटक केली.

मृत पावलेल्या बकऱ्यांचे पोलिस ठाण्याच्या बाजूला असलेल्या परिसरात शवविच्छेदन करण्यात आले. तसेच ट्रकमधून जप्त करण्यात आलेल्या मेंढ्या आणि बकऱ्या या सुरक्षिततेसाठी अहमदनगर येथील श्री जीवदया मंडळ चॅरीटेबल ट्रस्ट येथे पाठविण्यात आल्या आहेत. प्रति बकरी आणि मेंढीची किंमत ५ हजार रुपये असून अशाप्रकारे दोन्ही ट्रकमधून २० लाख ६० हजारांच्या बकरी, मेंढ्या ताब्यात घेतल्या आहेत. याशिवाय, दोन ट्रकची किंमत २० लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, ट्रकमधून ताब्यात घेतलेल्या मेंढ्या आणि बकऱ्यांमध्ये एक महिन्याचे बकरे आणि काही गर्भवती मेंढ्यांचा समावेश आहे, अशी माहीती जुई कुडतरकर यांनी दिली.