ठाणे : आयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि मुर्तीची प्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील बाजारपेठेत श्रीरामाचा ट्रेंड दिसत आहे. टी-शर्ट, साड्या, टोपी, शाल, मोबाईलचे कव्हर अशा विविध गोष्टींवर राम आणि आयोध्या मंदिराचे छायाचित्र असल्याचे दिसत आहे. या वस्तूंना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. तसेच बाजारातील काही दुकानांमध्येही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आयोध्या आणि रामाचे चित्र रेखाटले आहे. तर यानिमित्त वस्तू खरेदीवर सवलती देखील देण्यात आल्या आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामा च्या मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात रामाचा जागर सुरू झाला आहे. ठाणे, मुंबई, तसेच उपनगरातील बाजारातही असेच चित्र दिसून येत आहे. बाजारातील काही बड्या दुकानदारांकडून दुकानाच्या प्रवेशद्वारावर श्रीरामा चे छायाचित्र तसेच आयोध्या मंदिराचे छायाचित्र रेखाटण्यात आले आहे. तर, विद्युत रोषणाई करुन दुकान सजविण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त काही दुकानदारांनी वस्तू खरेदीवर सवलती देखील दिल्या जात असल्याचे चित्र आहे. बाजारात सिल्क प्रकारामध्ये जय श्री राम, राम सिया असे लिहीलेल्या साड्या तसेच कॅाटन आणि सिल्क प्रकारामंध्ये रामा चे आणि आयोध्या मंदिराचे छायाचित्र रेखाटलेले आणि जय श्री राम लिहिलेले टी-शर्ट विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या साड्यांची विक्री १५०० ते २००० रुपयांपर्यंत तर, टी-शर्ट ची विक्री २०० ते ३०० रुपयांपर्यंत करण्यात येत आहे, अशी माहिती ठाण्यातील विक्रेत्यांनी दिली. त्याशिवाय, शाल, मफलर, टोपी, झेंडे हे साहित्यही विक्रीसाठी उपलब्ध आहे. विशेष करुन श्री रामा चे छायाचित्र असलेले टी-शर्ट खरेदी करण्याकडे ग्राहकांचा जास्त ओढा असल्याची माहिती नवन्नाथ गोळेकर यांनी सांगितले.
हेही वाचा : डोंबिवलीतील अस्वस्थ नेत्यांचा भाजपला रामराम, राजाश्रयासाठी शिंदे अधिक सोयीचे
ऑनलाईन बाजारपेठेतही रामाचा ट्रेंड
आयोध्या मंदिर आणि रामाचे छायाचित्र असलेले विविध वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार ऑनलाईन बाजारातही सध्या आयोध्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अयोध्या मंदिराच्या प्रतिकृती, रामाची मूर्ती, मोबाईल कव्हर, पताक्यांच्या माळा, शाल, फूगे, चावीचे कीचन्स, बॅचेस असे विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. आयोध्या मंदिर आणि श्रीरामा ची प्रतिकृती ची विक्री १ हजार रुपयांपासून केली जात आहे. तर, १०० ते १५० रुपयांपर्यंत मोबाईल कव्हर, ४०० रुपयांपासून शाल, २०० रुपयांपासून चावीचे किचेन्स विक्री साठी उपलब्ध आहेत. त्यासह, श्रीराम आणि आयोध्या मंदिराची प्रतिकृती असलेल्या फूगे आणि बॅचेस चा संच ३०० ते ३५० रुपयांनी विक्री करण्यात येत आहे.
हेही वाचा : Badlapur Fire: बदलापूरच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट, आग लागल्याने एका कामगाराचा मृत्यू, चार जण जखमी
“आयोध्यातील श्री राम मंदिराचा उद्घाटन सोहळा देशभरात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त काही तरुणमंडळी तसेच ज्येष्ठ नागरिकांकडून श्रीरामा चे छायाचित्र आणि श्री राम लिहीलेले टी-शर्ट छापून घेण्याकडे सर्वाधिक मागणी आहे”, असे ठाणे येथील छपाई व्यावसायिक सुशांत गुरव यांनी म्हटले आहे.