ठाणे : माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट ) नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या बिष्णोई टोळीने केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भाचे निवेदन त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिले आहे. एप्रिल महिन्यात बिष्णोई टोळीकडून जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आला होता. हा फोन खंडणीसाठी करण्यात आला होता. जर खंडणी दिली नाही तर कफनची व्यवस्था करावी, असेही फोन करणाऱ्या व्यक्तीने तेव्हा धमकावले होते.
हेही वाचा : नौपाड्यात इमारतीतील सदनिकेला आग
माजी राज्यमंत्री बाबा सिद्धकी यांची शनिवारी रात्री भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या झाली आहे. या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून देशभरात या हल्ल्याचे पडसाद दिसून आले. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या हत्येमागे बिष्णोई टोळीचा हात असल्याचे तपासात समोर येत आहे. दरम्यान, माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून वर्तक नगर पोलिसांना एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. एप्रिल महिन्यात जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आला होता. आपण बिष्णोई टोळीचा असल्याचा दावा करीत त्याने त्याचे नाव रोहित गोदारा असे सांगितले. आपण ऑस्ट्रेलियातून बोलत असून त्याच्याच आदेशावरून सलमान खानच्या घरावर गोळीबार केला असल्याचे तो सांगत होता. तसेच त्याने आव्हाड यांच्याकडून खंडणीची मागणी केली. खंडणी दिली नाही, तर त्याचे परिणाम वाईट होतील असे तो म्हणाला. तुमचे कफन खरेदी करून ठेवा, अशी धमकी देखील त्याने दिली होती. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हे निवेदन पोलिसांना दिले आहे.