ठाणे : ठाणे महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप विकास योजनेचा आराखडा (डीपी प्लान) बांधकाम व्यवसायिकांसाठी तयार करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी करत नागरिकांचे आयुष्य भकास करु नका, आम्ही या आराखड्यास टोकाचा विरोध करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. रविवारी सकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कळव्यातील नागरिक प्रारुप विकास आराखड्याविरोधात एकत्र जमले होते.

या विकास आराखड्यातील रस्त्यामुळे तीनशे ते चारशे इमारती उद्वस्थ होणार आहे. मागील अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करु असे सांगितले होते. सोमवारपासून होणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नावर मुख्यमंत्री उत्तर देतील असे आव्हाड म्हणाले. ज्याने हा विकास आराखडा तयार केला. तो व्यक्ती आंधळा असावा कारण, मैदानातून, गृहसंकुलाच्या इमारतींवरुन विकास आराखड्यातील मार्गिका जात आहे. नागरिकांनी आयुष्याची पुंजी घरासाठी लावली आहे. हे लोक आता राहणार कुठे याचे उत्तर सरकारने द्यावे असे आव्हाड म्हणाले.

हा विकास आराखडा नेमका कोणासाठी बनविला हे कळत नाही. लोकांना उद्धवस्थ करुन झालेला विकास आम्हाला मान्य नाही. या आराखड्यास आम्ही टोकाचा विरोध करणार आहोत असा इशारा आव्हाड यांनी दिला. हा विकास आराखडा विकाससकांसाठी तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

Story img Loader