ठाणे : कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वर्षातील कथित विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असल्याचा इशारा अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला. तसेच राज्य सरकारकडून या मतदारसंघात आता ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचा दावाही परांजपे यांनी केला. तर ५० कोटी रूपये देऊन तुम्ही जनतेला विकत घ्याल; अशी अपेक्षा ठेवू नका. कारण, जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली.
कळवा- मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड आमदार म्हणून निवडून येतात. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांची साथ सोडली आहे. या दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात टीका केली जात आहे. सोमवारी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पत्रकार परिषदेत आरोप केले. तसेच कळवा मुंब्रा मतदार संघात ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केला. राज्य सरकारकडून कळवा मुंब्रा मतदारसंघातील माजी नगरसेवकांच्या विविध पॅनलमध्ये ५० कोटी रुपयांच्या निधीच्या विकास कामांसाठी वितरण केले जाणार आहे. तसेच कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वर्षातील कथित विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार आहे. या विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेवकांच्या मागणीनुसार ५० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंब्रा कळव्याच्या विकासाची खरी सुरुवात आता झाली आहे. येथील आमदारांकडून विकासाच्या नावाखाली मागील काही वर्षात त्यांचे स्वीय साहाय्यक आणि ठेकेदार यांच्या मागणीप्रमाणे विकास निधीचा कसा व कुठे वापर झालेला आहे, याचा लेखाजोखा प्रसिद्धी माध्यमांनीच प्रसिद्ध केला आहे असा आरोपही परांजपे यांनी केला आहे. कळवा मुंब्रा मतदारसंघात अल्पसंख्यांक विभागाकडूनही विशेष निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली.
हेही वाचा : डोंबिवलीत पती-पत्नीला तलवारीचा धाक दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न
तर या आरोपांना जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंब्य्रासाठी ५० कोटीचा निधी दिला. त्याबद्दल अजित पवार यांचे आभार मानतो. पण, ५० कोटी रूपये देऊन तुम्ही जनतेला विकत घ्याल; अशी अपेक्षा ठेवू नका. बारामतीला एक हजार कोटीचा निधी दिला होता. मात्र, बारामतीकरांनी गुर्मी उतरवली ना? जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते; हे ध्यानात ठेवा, अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
हेही वाचा : भिवंडीत काँग्रेसच्या माजी नगरसेवकाविरोधात अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल , ठाणे एसीबीची कारवाई
आमच्याशी गद्दारी करून बाहेर पडल्यानंतर मी अजित पवार यांच्यावर तोफ डागली होती. त्यामुळे ते मला निधी देताना हात आखडता घेतील, यात वादच नव्हता. या आधीही तीन वर्षे ते असेच वागत होते. आता माझ्याविरुद्ध ज्याला उभा करायचा आहे. त्याच्या नावे हा निधी दिलेला आहे. एवढेच नाही तर आमच्या नगरसेवकांना पाच कोटीची ऑफरही दिली होती; पण, एकही नगरसेवक त्यांच्याकडे गेला नाही. त्यामुळे आता पन्नास कोटी दिले आहेत. तसे पाहता ते हजार कोटीही आणतील. पण, ज्यांनी हा निधी आणलाय त्यांनी आपल्या वाॅर्डातही बघावे. आपल्या वाॅर्डातील स्लाॅटर हाऊसच्या रस्त्याची काय अवस्था आहे, हे त्यांनी पहावे. आमदाराला निधी न देता जो माणूस आता नगरसेवकही नाही: त्याला निधी दिला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदाच घडत आहे. याची जनता नोंद घेणारच आहे. कारण, अजित पवारांसोबतच्या आमदारांना त्यांनी हजारो कोटींचा निधी दिला होता. तरीही ते लोकसभेच्या निवडणुकीत मागे पडले. म्हणूनच ते आता आमचे दार ठोठावत आहेत. निधी देऊन मुंब्र्यातील जनता खुष होणार नाही. कारण, येथील जनतेला विकास काय आहे, हे चांगलेच माहित आहे. आणि हा विकास त्यांना कुणी दाखवला हे देखील ते जाणतात. जनतेला गद्दारी कधीच रुचत नाही. अजित पवार हे किती कोत्या मानसिकतेचे आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले. अजित पवार हे आपणाला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण, मी सक्षम आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : कळवा, मुंब्रा, दिवा भागात शुक्रवारी पाणी नाही; ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार
या पन्नास कोटीवरून एक योगायोग जुळून आला आहे. ज्यांच्या कपाळावर ५० खोक्यांचा शिक्का बसला आहे. त्यांनी आपल्या गटालाही ५० खोके दिले आहेत. मात्र, पैशाच्या वापराने मतदारांना खरेदी करता येत नाही, हे बारामतीच्या मतदारांनी शिकवल्यानंतर यांना अद्दल घडेल, असे आपणाला वाटले होते. मात्र, त्यातूनही ते काही शिकलेले नाहीत. सर्वच लोक पैशाने विकत घेतले जाऊ शकत नाहीत. गरीबांनाही स्वाभिमान असतो, ते तुमच्यासारखे विकाऊ नसतात, असा टोला देखील आव्हाड यांनी लगावला.