ठाणे : कळवा रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी सकाळच्या वेळेत कारशेडमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यातून शेकडो प्रवासी प्रवास करत होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच कारशेड परिसरातील रेल्वे रुळ ओलांडणे बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कळवा पश्चिमेला पादचारी पूलाच्या निर्माणाचे काम सुरू झाले आहे. कळवा स्थानकाच्या पश्चिमेला रिक्षा थांब्याजवळ पादचारी पूल बांधला जात असून हा पूल रेल्वे स्थानकातील मुख्य पादचारी पूलाशी जोडला जाणार आहे. या पादचारी पूलामुळे अपघातांनाही आळा बसण्याची शक्यता आहे. हा पूल मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कळवा रेल्वे स्थानकातून दिवसाला किमान लाखभर प्रवासी वाहतुक करतात. या रेल्वे स्थानकात केवळ धिम्या रेल्वेगाड्यांना थांबा आहे. त्यामुळे अनेक प्रवासी ठाणे स्थानकातून जलद रेल्वेगाड्यांतून प्रवास करता यावा तसेच सकाळी स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी कारशेडमधून सुटणाऱ्या रेल्वेगाडीने ठाणे रेल्वे स्थानक गाठत आहेत. ही रेल्वेगाडी ठाणे ते सीएसएमटी अशी सोडली जाते. कळवा कारशेडमधून प्रवाशांनी अवैधरित्यारित्या प्रवास करु नये यासाठी रेल्वे सुरक्षा अधिकारी तसेच रेल्वे प्रशासनाने अनेकदा कारवाई केली जाते. परंतु प्रवाशांकडून अवैधरित्या प्रवास सुरूच आहे. या प्रकारामुळे ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेगाडीत प्रवेश करणे कठीण होते. ठाणे -सीएसएमटी रेल्वेगाडी असतानाही प्रवेश मिळताना कसरत करावी लागत असल्याने ठाणेकरांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. तसेच रेल्वे स्थानकातून पश्चिमेकडे जाण्यासाठी प्रवाशांना कारशेडचे रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते. अनेकदा रेल्वे रुळ ओलांडताना अपघाताची भिती देखील व्यक्त केली जाते.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून (एमआरव्हीसी) आता पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल बांधण्यास सुरूवात केली आहे. हा पूल पश्चिमेतील रिक्षा थांब्याजवळ उतरणारा आहे. त्यामुळे कळवा स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना थेट पश्चिमेतील रिक्षा थांब्यावर जाता येणार आहे. हा पूल कळवा रेल्वे स्थानकातील मुख्य पादचारी पूलाला जोडला जाणार आहे. पूल बांधून पूर्ण झाल्यास येथील रेल्वे रुळाजवळ असलेला प्रवेशद्वार पूर्णपणे बंद होणार आहे. तसेच कारशेडमधून होणारी अवैध प्रवासी वाहतुकही रोखली जाणार आहे.
प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी अतिक्रमण नियंत्रण प्रकल्पांतर्गत मुंंबई रेल्वे विकास महामंडळ कळवा स्थानकाजवळ एक नवीन पादचारी पूल बांधत आहे. पादचारी पूलाचे बांधकाम योजनेनुसार प्रगतीपथावर आहे. मे किंवा जून पर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय लक्षणीयरीत्या वाढेल.
सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई रेल्वे विकास महामंडळ.