ठाणे : घोडबंदर भागातील कासारवडवली परिसरात असलेल्या एका ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये एक जिवंत हरीण अडकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, वन विभाग आणि वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या मदतीने हरीणाला सुखरुप बाहेर काढून पुन्हा त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात सोडण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.

घोडबंदर भागात एका बाजूला खाडी किनारा तर, दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तीर्ण परिसर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध प्राणी, पक्ष्यांचा अधिवास आहे. परंतू, मागील काही वर्षांपासून घोडबंदर भागात प्रचंड लोकवस्ती देखील वाढली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग याठिकाणी येत असल्यामुळे अनेकदा याठिकाणी बिबट्या तसेच अन्य प्राणी आढळून आले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून हे प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधार्थ बाहेर येत असतात.

त्यातच, सोमवारी घोडबंदर कासारवडवली भागात एक हरिण आढळून आले. एम.बी.सी. पार्क जवळ एक ट्रान्सफॉर्मर केबिन आहे. या केबिनमध्ये दुपारी १ वाजताच्या सुमारास एक हरिण शिरल्याचे समजले. हे हरिण ट्रान्सफॉर्मरमध्ये अडकून बसले होते.

याची माहिती पोलिस हवालदार यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी – कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी -कर्मचारी आणि वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. वन विभाग आणि वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशने अथक प्रयत्न करुन हरणाला सुखरुपरित्या पकडले आणि त्याला बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

सुखरुप असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हरीणाला राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये मुक्त करण्यात आले, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. हे हरिण याठिकाणी आले कसे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर, घोडबंदर भागातील कासारवडवली परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग येतो. हे हरिण राष्ट्रीय उद्यानातूनच आले असावे असा दावा वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनेच्या वतीने करण्यात आला आहे.