कल्याण : शहापूर तालुक्यातील शेरे गाव (वासिंद-शेई) हद्दीत गोंधळीपाडा येथे बुधवारी रात्री एका शेतकऱ्याच्या पाळीव श्वानाची बिबट्याने शिकार केल्याने परिसरातील गावांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे शहापूर वनाधिकाऱ्यांनी शेरे परिसरातील जंगलात तातडीने तीन पाळत (ट्रॅप) कॅमेरे बसवून या भागातील दिवसा, रात्रीची गस्त वाढवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंधळीपाडा येथील शेतकरी बाळाराम अंदाडे यांच्या पाळीव श्वानाची परिसरातील जंगलात बुधवारी शिकार झाल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. या भागातील रस्त्यांवर बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले. मृत श्वानाच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे बिबट्यानेच ही शिकार केली आहे, अशी माहिती शेरे परिसरातील ग्रामस्थांनी शहापूर वन अधिकाऱ्यांना दिली.

हेही वाचा…ठाणे: भरधाव रिक्षा दुभाजकाला धडकल्याने मोठा अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी

ग्रामस्थांच्या माहितीच्या आधारे उपवन संरक्षक सचीन रेपाळ, साहाय्यक उपवन संरक्षक भाग्यश्री पोळे, वन परिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल साईनाथ साळवी यांनी शेरे परिसरात दिवसा, रात्रीची गस्त सुरू केली आहे. तसेच या भागातील भातसई, शेरे, अंबर्जे, मासवणे, आंबिवली, बावघर, वेहळे, कलमपाडा, वासिंद गावांमध्ये जाऊन बिबट्या दिसल्या तर घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

पाळीव श्वानाची शिकार बिबट्या की अन्य हिंस्त्र वन्यजीवाने केली आहे, याबाबत बिबट्याचा प्रत्यक्ष या भागातील संचार किंवा तो पाळत कॅमेऱ्यांमध्ये दिसल्या शिवाय नक्की सांगता येणार नाही, असे वन विभागाचे अधिकारी सांगतात. रात्रीच्या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये. दुचाकीवरून रात्रीच्या वेळेतील प्रवास टाळावा. गाव परिसरात बिबट्या आढळला तर त्याची खोड काढू नये. समुहाने त्याचा पाठलाग करू नये. गोधन बांधलेल्या गोठ्याचा दरवाजा रात्री बंदिस्त करावा. बिबट्या दिसून आल्यास मोठ्याने आवाज करावा, मोठ्याने वाद्य किंवा फटाके वाजवावेत, अशी माहिती अधिकारी ग्रामस्थांना देत आहेत.

हेही वाचा…कल्याण डोंबिवलीसाठी अलर्ट… मंगळवारी पाणीपुरवठा बंद रहाणार

गेल्या दीड वर्षात शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण भागांमध्ये बिबट्याचा संचार आढळून आला आहे. जुन्नर जंगल पट्टीतील बिबटे अनेक वेळा मादी, भक्ष्याच्या शोधार्थ वाटचाल करतात. ते मुरबाड, बारवी धरण जंगल, शहापूर भागातून कसारा, तानसा अभयारण्यातून नाशिककडे जातात, असे वन्यजीव अभ्यासकाने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane leopard suspected in attack on domestic dog near shere village shahapur forest officials intensify surveillance and patrolling psg