ठाणे : वर्तकनगर येथील रेमंड रिॲलिटी या गृहसंकुलातील उद्वाहक कोसळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेत ११ वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वीच या इमारतींचे बांधकाम झाले होते. त्यामुळे उद्वाहकाच्या देखभाल दुरुस्तीविषयी गृहसंकुलातील रहिवाशांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शुभ मंगरूळकर असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याचे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या जागेत रेमंड रिॲलिटीचे ४२ मजल्याचे काही टाॅवर आहेत. यातील विस्टा या टाॅवरमधील ए विंगमधील उद्वाहक तळमजल्यावरून वरील मजल्यावर जात होते. या उद्वाहकामध्ये ११ व्या मजल्यावर राहणारे शुभ, ३७ व्या मजल्यावर राहणारे नरेश आणि दोन कामगार होते. उद्वाहक पहिल्या मजल्यावर आले असता, अचानक या उद्वाहकाची दोरी तुटली. त्यामुळे उद्वाहक तळ मजल्यावर कोसळले. उद्वाहकामधील काचा देखील फुटल्या. तसेच मोठा आवाज झाला. या घटनेत शुभ यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली.
हेही वाचा : कल्याण पूर्वेत सुलभा गायकवाड यांचे काम न करण्याचा शिवसेना नगरसेवकांचा इशारा
हा अपघात घडल्यानंतर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर घटनास्थळी पथके दाखल झाली. रहिवाशांकडून या घटनेविषयी संताप व्यक्त केला जात होता. अवघ्या दीड वर्षांत इमारतीमधील उद्वाहक कोसळल्याने उद्वाहकाच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वर्तकनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रहिवाशांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी धाव घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.