कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात पादचारी, प्रवाशांना लुटण्याच्या वाढत्या घटनांनी नागरिक हैराण आहेत. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पादचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून, दमदाटीचा अवलंब करून नागरिकांजवळील पैसे, दागिने भुरट्या चोरट्यांकडून लुटले जात आहेत. कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा भागात राहणारे राॅबिनसन पवार (६७) पत्नीसह शिवाजी चौक भागातून बुधवारी रात्री नऊ वाजता पायी चालले होते. त्यावेळी त्यांच्या समोर दोन अनोळखी इसम अचानक येऊन उभे राहिले. त्यांनी राॅबिनसन यांना बोलण्यात गुंतवले.
हेही वाचा : ठाणे : आर माॅल पादचारी पुलावर तरुणीला जीवे मारण्याची धमकी, मोबाईलही खेचला; पूल महिलांसाठी असुरक्षित?
तेवढ्यात त्याने राॅबिनसन यांना संमोहित केले असावे, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. एक जण रांबिनसन यांच्या पत्नी बरोबर बोलू लागला. पती, पत्नीला बोलण्यात गुंतवून भुरट्या चोरांनी तक्रारदार यांच्या हातामधील सोन्याची अंगठी, लाॅकेट, पाकिटमधील पैसे असा ३८ हजार रूपयांचा ऐवज काढून घेतला. पवार दाम्पत्याला काही न कळता ते तेथून पळून गेले. काही क्षण आपल्या भोवती काय झाले हे पवार दाम्पत्याला कळलेच नाही. आपल्या जवळील ऐवज भुरट्यांनी लुटून नेला आहे याची जाणीव झाल्यावर राॅबिनसन यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.
हेही वाचा : महानगरांच्या कोंडीमुक्तीसाठी सामायिक आराखडा; ठाण्यासह नवी मुंबई, पालघर, मीरा-भाईंदर पोलिसांचे नियोजन
गेल्या १५ दिवसांत चार ते पाच जणांना कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. कल्याण बस आगाराजवळ मुरबाड मधील एका वृध्द महिलेला लुटले होते. त्यानंतर उत्तरप्रदेशात निघालेल्या एका प्रवाशाला चार जणांनी लुटले होते. रात्री ११ वाजल्यानंतर कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात भुरट्या चोरांचा उपद्रव वाढला आहे. पोलिसांना या भागातील गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.