ठाणे : भिवंडी येथील कांबा गाव भागात एका भरधाव वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मनोहर गवळी (५५) असे मृताचे नाव असून ते मित्रासोबत हाॅटेलमध्ये जेवणासाठी निघाले होते. या अपघातात मनोहर यांच्या मित्राला देखील दुखापत झाली आहे. याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भिवंडी येथील अजय नगर परिसरात मनोहर गवळी राहतात. त्याच भागात त्यांचा मित्र देखील राहतो. दोघेही रिक्षा चालक आहेत. ते अनेकदा कांबा परिसरातील हाॅटेलमध्ये जेवण्यासाठी जात असतात. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांनी जेवण्याचा बेत आखला. त्यानुसार ते रिक्षाने कांबागावच्या दिशेने निघाले. मनोहर हे रिक्षा चालवित होते. तर त्यांचा मित्र रिक्षाच्या मागील आसनावर बसला होता. रिक्षा कांबा गावाजवळी आली असता, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात मनोहर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर त्यांच्या मित्राला पायाला दुखापत झाली. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरुन पळून गेला.

परिसरातील दोन रिक्षा चालकांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले. मनोहर यांच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मनोहर यांना पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाता प्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.