ठाणे : श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्षे स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या यात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा या दृष्टीकोनातून न्यास आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘एक धाव देशासाठी’ या उपक्रमांतर्गत युवा दौडचे आज आयोजन करण्यात आले होते. या युवा दौड मध्ये शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील जवळपास दीड हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या युवा दौडची सुरुवात आज सकाळी ६. ३० वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दौड ज्योत प्रज्वलीत करून तसेच प्रतिज्ञा घेऊन रंगो बापूजी गुप्ते चौक येथून झाली. या युवा दौड च्या माध्यमातून स्वामी विवेकानंदाचे विचार समाजात पोहोचावे यासाठी स्वामी विवेकानंदांचे छायाचित्र आणि विचार असलेले टी शर्ट घालून युवक या दौड मध्ये सहभागी झाले होते. जवळपास १५०० – २००० युवकांनी या दौड मध्ये सहभाग घेतल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : शहापूर तालुक्यातील ४४५ अंगणवाड्या वीज जोडणी अभावी अंधारात
या मार्गावरुन निघाली युवा दौड…
मासुंदा तलावाजवळील रंगो बापूजी गुप्ते चौक येथून युवा दौडला सुरुवात झाली. टेंभी नाका मार्गे सिव्हील रुग्णालय हून आंबेडकर रोड – खोपट सिग्नल कडून डावीकडे एसएमसी वरुन वळसा घेऊन वंदना टॉकीज जवळ – तीन पेट्रोल पंप मार्गे हरीनिवास सर्कलहून डावीकडे वळसा घेऊन जय भगवान सभागृह तिथून डावीकडे गजानन वडापाव – विष्णूनगर सत्यम कलेक्शन नाका- सेलिब्रेशन दुकान राम मारुती रोड येथून डावीकडे वळसा घेऊन पुना गाडगीळ ज्लेलर्सहून उजवीकडे वळसा घेऊन तलावपाळी मार्गे गडकरी रंगायतन पुन्हा बापूजी गुप्ते चौक येथे या युवा दौडचा समारोप झाला.
हेही वाचा : ठाण्यात गेल्या वर्षभरात ७५ टक्के गुन्हे उघडकीस
संरक्षणाच्या दृष्टिकोनातून विशेष व्यवस्था
युवकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून युवा दौडच्या मार्गांवरील चौकाचौकात स्वयंसेवक उभे करण्यात आले होते. तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.