ठाणे: महिलांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे महापालिका परिवहन विभागाने काही वर्षांपूर्वी शहरातील विविध मार्गावर तेजस्विनी बसगाड्या सुरु केल्या होत्या. या बस गाड्या सकाळ आणि सायंकाळ या गर्दीच्या वेळेत केवळ महिलांसाठी तर, दुपारच्या वेळेत सर्वांसाठी चालविली जाणार होती. परंतू, परिवहन विभागाची ही योजना अवघ्या काही वर्षातच बारगळ्याचे दिसत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत दररोज बसगाड्या अपुऱ्या पडत असल्यामुळे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या वेळेत तेजस्विनी मधून पुरुषांनाही घेऊन जावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरातील विविध भागात महापालिका परिवहन विभागाच्या बस गाड्या धावतात. परिवहन विभागाच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन तसेच महिलांचा प्रवास सुखकर होण्यासाठी ५० तेजस्विनी बसगाड्यांची खरेदी करण्यात आली होती. परंतू, त्यापैकी सध्या ४७ बस ठाणे शहरात धावतात. ठाणे स्थानक पश्चिम ते वृंदावन सोसायटी, ठाणे स्थानक पश्चिम ते लोकमान्यनगर, ठाणे स्थानक पश्चिम ते वागळे आगार, ठाणे स्थानक पश्चिम ते गावंडबाग, ठाणे स्थानक पश्चिम ते पवारनगर, ठाणे स्थानक पश्चिम ते खारेगाव, ठाणे स्थानक पश्चिम ते कासारवडवली, ठाणे स्थानक पश्चिम ते धर्माचापाडा, ठाणे स्थानक पश्चिम ते दादलानीपार्क आणि ठाणे स्थानक पश्चिम ते कोलशेत अशा विविध मार्गांवर या बस चालविल्या जातात.

हेही वाचा : बदलापूर ते डोंबिवली परिसरात धो धो, मान्सूमोत्तर पावसाने अनेक भाग जलमय; नागरिकांची तारांबळ

सकाळी ठाणे स्थानकात येण्यासाठी तर, रात्री ठाणे स्थानकाकडून घरी परतणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक असते. सकाळी शहरातील विविध बस थांब्यांवर तसेच सायंकाळी सॅटीस पुलावर प्रवाशांचा लांबलचक रांगा पाहायला मिळतात. या रांगेत पुरुषांसह महिलांचाही तितकाच समावेश असतो. त्यामुळे महिला वर्गाला रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागू नये, त्यांचा प्रवास सुखरुप व्हावा यासाठी महिलांसाठी गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी आणि सायंकाळ वेळेत या बसमधून केवळ महिला प्रवासी प्रवास करतील असे ठरविण्यात आले होेते. परंतू., ही योजना अवघे काही वर्षच सुरु राहिल्याचे दिसते. सध्या शहरात सुरु असलेल्या तेजस्विनी गाड्यांमधून सकाळ -सायंकाळ महिलांसह पुरुष देखील प्रवास करताना दिसून येत आहे. त्यामुळे महिलांची देखील गैरसोय होत आहे. सकाळ आणि सायंकाळी बस थांब्यावर महिलांना बराच वेळ बस ची वाट पाहत तात्काळत उभे राहावे लागते. त्यामुळे तेजस्विनी बस या केवळ नावापुरत्याच शहरात चालविल्या जातात का, असा सवाळ महिलांकडून विचारला जाऊ लागला आहे.

हेही वाचा : कल्याण डोंबिवली पालिकेतील फेरीवाला हटाव पथकातील १३४ कामगारांच्या बदल्या

शहरात दररोज ठाणे परिवहन विभागाच्या ३७४ बसगाड्या धावतात. परंतू, शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत या बस अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे सध्या तेजस्विनी बस पूर्ण वेळ सर्व प्रवाशांसाठी चालविल्या जात आहेत. येत्या काळात परिवहन विभागात नव्या बसगाड्या येणार आहेत. त्या बस येताच, तेजस्विनी बस ठरविल्य़ाप्रमाण सकाळ आणि सायंकाळ केवळ महिलांसाठी चालविल्या जातील, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane men passengers also travelling in tejaswini buses which started specially for women css