ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे आहेत. निवडणूक तोंडावर आहेत. टोल दरवाढीवरून जनतेत असलेला आक्रोश आणि राग त्यांनाही परवडणारा नाही, असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केले आहे. येत्या एक ते दोन दिवसांत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन टोल दरवाढीबाबत चर्चा करणार असून त्यानंतरच टोल दरवाढीचे पुढे काय होते ते सांगेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. पेडर उड्डाणपूल झालेला नसून त्याचे पैसेही टोलमधून वसूल केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या पदाधिकारी उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाधव यांनी भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतले. यानंतर ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या अनेक वर्षे टोलसंदर्भात मनसेने अनेक आंदोलने केली. अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास ६५ ते ६७ टोलनाके आम्ही बंद केले. त्याचवेळी भाजपा-शिवसेनेने जाहीरनाम्यामध्ये टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांना टोलमुक्त महाराष्ट्राचे काय झाले, हे कधीच विचारले जात नाही. प्रत्येकवेळी टोलच्या आंदोलनाचं काय झाले, असा प्रश्न मला विचारला जातो. मात्र, त्याचे परिणाम अनेकांना दिसत नाहीत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : “आज गांधीसप्ताह संपणार, उद्यापासून…”, टोल दरवाढीवरून मनसेचा इशारा, “आमच्या हाताची भाषा…”
ठाण्यातील पाचही टोलनाक्यांवर जे कर लावले आहेत. यामध्ये नमुद केलेल्या रस्त्यामध्ये पेडर रोडवरच्या उड्डाणपुलाचा समावेश आहे, जो अजूनपर्यंत झालेला नाही आणि आता होण्याची शक्यताही नाही. म्हणजेच पूर्ण झालेला नाही, त्या रस्त्याचेही पैसे घेतले जातात, असा आरोपही त्यांनी केला आहे. टोल नाक्यावरून किती वाहने जातात आणि किती टोल जमा होतो, त्या रकमेचे काय होते, हा प्रश्न आहे. रस्ता कर तसेच टोलही भरावे लागतात आणि इतर करही आपण भरतो. परंतु शहरांतील रस्त्यांवर खड्डे असतात आणि रस्ते नीट बांधले जात नाहीत. मग पैसे जातात कुठे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मला जनतेचे आश्चर्य वाटते की निवडणुकीच्या काळात थापा मारतात, तुम्हाला पिळ पिळ पिळतात आणि तुम्हाला त्यांनाच मतदान करायचे आहे. जे लोक तुमच्याशी खोटं बोलत आहेत, त्यांना कधी कळत नाही की आपण ज्या गोष्टी करतोय, त्या चुकीच्या आहेत. विरोधात मतदान झालेच नाही तर त्यांना समजणार कसे असे राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : “उपोषण करणं हे आपलं काम नाही, मी उद्या…”; ठाण्यातील उपोषणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
याचिका का मागे घेतली
टोलविरोधात एकनाथ शिंदे यांनीही याचिका केली होती. त्यांनी ही याचिका का मागे घेतली आणि कोणी मागे घ्यायला लावली, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारायचा असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. “मागील चार दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अविनाश जाधव यांना मागे घेण्यास सांगितले आहे. या लोकांसाठी जीव गमावू नकोस, असे मी अविनाश यांना सांगितले आहे. कारण एक जीव गेल्याने त्यांना काहीही फरक पडत नाही”, असे ठाकरे म्हणाले.