ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मनसेचे नेते राजु पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. अविनाश जाधव यांना ठाणे शहर विधानसभेतून उमेदवारी जाहीर होताच, त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनदं आश्रमात जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण केले. भाजप आणि शिवसेना महायुती असून या मतदारसंघातून भाजपचे आमदार संजय केळकर हे तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. संजय केळकर यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेच्या (शिंदे गट) काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अविनाश जाधव आनंद आश्रमात गेल्याने आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

ठाणे विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु २०१४ च्या निवडणूकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. संजय केळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार रविंद्र फाटक यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेना भाजपची युती होती. त्यावेळी या मतदारसंघात भाजपने पुन्हा केळकर यांना उमेदवारी दिली. यावेळी मनसे आणि भाजप अशी थेट लढत होती. मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा या निवडणूकीत केवळ २० हजार मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी शिवसेनेतील एका गटाची अविनाश जाधव यांना छुपी साथ मिळाल्याची चर्चा रंगली होती. त्यातच, केळकर यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने शिंदे गटामधील निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा : ठाणे: बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके याला सर्व प्रकरणात जामीन

केळकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळ येथे गेले होते. परंतु त्यांच्यासोबत शिवसेनेतील महत्त्वाचे पदाधिकारी दिसून आले नाहीत. दुसरीकडे सोमवारी दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांना ठाणे शहर विधासभा निवडणूकीसाठी मनसेकडून उमेदवारी जाहीर केली. मंगळवारी अविनाश जाधव हे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आनंद आश्रम येथे गेले. आनंद आश्रमात शिंदे गटाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते. अविनाश जाधव यांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. जाधव यांनी दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अविनाश जाधव हे आनंद आश्रमात आल्याने आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

Story img Loader