ठाणे शहर मतदार संघातून मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी शक्ती प्रदर्शन केले तसेच शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले. महायुतीचे उमेदवार संजय केळकर आणि ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचार यांचे अविनाश जाधव यांच्यासमोर आव्हान आहे. काही दिवसांपूर्वी टेंभी नाका येथील आनंद आश्रमात अविनाश जाधव गेले होते. महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या विषयी शिंदे गटामध्ये काहीशी नाराजी आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेनेच्या एका गटाने अविनाश जाधव यांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये कोणती समीकरणे तयार होतात याकडे ठाणेकरांचे लक्ष लागून आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु २०१४ च्या निवडणूकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. संजय केळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार रविंद्र फाटक यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेना भाजपची युती होती. त्यावेळी या मतदारसंघात भाजपने पुन्हा संजय केळकर यांना उमेदवारी दिली. यावेळी मनसे आणि भाजप अशी थेट लढत होती. युती असतानाही मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा या निवडणूकीत केवळ २० हजार मतांनी पराभव झाला होता. शिवसेनेतील एका गटाची अविनाश जाधव यांना छुपी साथ मिळाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यातच, केळकर यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने शिंदे गटामधील निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. केळकर यांना उमेदवारी मिळाल्याने शिंदे गटातून माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच माजी नगरसेवक संजय भोईर यांनी बंड पुकारल्याचे चित्र आहे. उमेदवारी जाहीर होताच मंगळवारी अविनाश जाधव हे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आनंद आश्रम येथे गेले होते.

हेही वाचा : डोंबिवली आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सी जमीनदोस्त

आनंद आश्रमात शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते. अविनाश जाधव यांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. जाधव यांनी दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. गुरुवारी दुपारी अविनाश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत टेंभी नाका येथील आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. ठाण्यात आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीची समीकरणे नेमकी कशी असतील. याबाबत चर्चांना आता उधाण आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane mns leader avinash jadhav visit anand dighe memorial before filling application form css