उल्हासनगर : फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी रोख रक्कम नेणाऱ्या व्यापाऱ्याकडून ८५ हजारांची खंडणी उकळणाऱ्या उल्हासनगरातील आचारसंहिता भरारी पथकातील पाच जणांविरूद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २८ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडल्यानंतर याप्रकरणी १३ दिवसांनंतर ९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू होता की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. आरोपींमध्ये तीन उल्हासनगर महापालिका कर्मचारी आणि दोन पोलिसांचा सहभाग आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीच्या आचारसंहिता काळात राज्यातील विविध ठिकाणी भरारी पथकांकडून कारवाई केली जात असून त्यात रोख रक्कम, सोने आणि इतर साहित्य जप्त केले जाते आहे. मात्र त्या कारवाईवर विरोधी पक्षांकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या एका प्रकाराबद्दल ९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे पाचच्या सुमारास व्यापारी बबन आमले आणि त्यांचे मित्र नितीन शिंदे आपल्या चारचाकीने कल्याणवरून म्हारळ चौकीमार्गे अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील फूल उत्पादन शेतकऱ्यांना दसऱ्यात विक्री झालेल्या मालाचे रोख पैसे घरपोच देण्यासाठी जात होते. त्यावेळी येथे असलेल्या भरारी पथक क्रमांक सहाचे प्रमुख संदीप शिरसवाल यांनी त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे ७ लाख ५० हजार रूपये रोख सापडले. याबाबत पथकप्रमुखांनी त्यांना गुन्हा दाखल होण्याची भीती दाखवली. त्यावेळी आमले यांनी या रोख रकमेबाबत पावत्याही दिल्या. मात्र त्यानंतरही शिरसवाल यांनी दोघांकडून ८५ हजार रूपये खंडणी स्वरूपात काढून घेतले. या चौकशीवेळी चित्रिकरण आले नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रकाराची माहिती भरारी पथक क्रमांक ३ चे प्रमुख संकेत चनपूर यांना होती. मात्र त्यांनीही शिरसवाल यांच्या कृत्याला मुकसंमती दिली. तसेच पथकातील आण्णासाहेब बोरूडे, पोलिस हवालदार विश्वनाथ ठाकूर, पोलीस राजरत्न बुकटे यांनी वरिष्ठांना माहिती दिली नाही. मात्र याबाबत स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीसांतील वरिष्ठांना माध्यम प्रतिनिधींनी जाब विचारल्यानंतर वेगाने सुत्रे हलली. त्यानंतर यातील सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले. अखेर उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त आणि सध्या उल्हासनगर विधानसभेचे आचारसंहित पथक प्रमुख सुनिल लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या पाच जणांवर १३ दिवसांनंतर खंडणी आणि आचारसंहिता पालनात कसूर केल्याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात

या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यासाठी इतका वेळ का लागला, यात राजकीय दबाव होता का, कुणाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न होता का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. तसेच या प्रकारानंतर जर भरारी पथकाकडूनच खंडणी वसूल केली जात असल्यास आदर्श आचारसंहितेचे काय असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात

हा प्रकार २८ ऑक्टोबर २०२४ रोजी घडला असला तरी तो ३१ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला. त्यानंतर संबंधित पथकातील कर्मचारी आणि पोलीस यांचे जबाब नोंदवले. तक्रारदारांची तक्रार घेतल्यानंतर आणि सर्व प्रक्रिया केल्यानंतर पालिका प्रशासनाला याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ९ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून सर्वच पथकांना सर्व तपासणीचे चित्रीकरण करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

विजयानंद शर्मा, उपविभागीय अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी, उल्हासनगर विधानसभा.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane model code of conduct enforcement team extortion of rupees 85 thousand from a farmer carrying cash after selling flowers css