ठाणे : तुमचे वाहन रस्त्याकडेला उभे असल्यास ते चोरट्यांच्या नजरेपासून सुरक्षित आहे की नाही याची खात्री करा. कारण तुमचे वाहन केव्हा चोरी होईल सांगता येत नाही. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात २०२४ या वर्षभराच्या कालावधीत १ हजार ३०० हून अधिक वाहनांची चोरी झाली आहे. सर्वाधिक वाहने दुचाकी आहेत. तर मोटारी आणि तीन चाकी वाहनांच्या चोरीचे प्रमाणही अधिक आहे. या आकडेवारीची सरासरी केल्यास महिन्याला १०० हून अधिक वाहनांची चोरी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे पोलिसांच्या आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी यासारखे महत्त्वाचे भाग येतात. या शहरांमध्ये काही ठिकाणी रस्त्याकडेला वाहने उभी करण्यास परवानगी आहे. तर काही ठिकाणी कामानिमित्ताने नागरिक रस्त्याकडेला वाहने उभी करतात. शहरांतील काही जुन्या इमारतींमध्ये वाहन तळाची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे गृहसंकुलातील रहिवासी देखील त्यांची वाहने रात्रीच्या वेळेत इमारती बाहेरील परिसरातील रस्त्याकडेला उभी करत असतात.

पोलीस दलाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ठाणे आयुक्तालय क्षेत्रात २०२४ या वर्षीच्या १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत १ हजार ३४५ वाहने चोरीला गेली आहेत. यामध्ये सर्वाधिक दुचाकींचा सामावेश असून ९९४ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. या वाहनांची किंमत आठ कोटी १२ लाख ५१ हजार ९०२ रुपये इतकी आहे. वाहन चोरी प्रकरणांमध्ये १ हजार ३५१ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याप्रकरणांचा तपास संबंधित भागातील पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी, अधिकारी करतात. तर समांतर तपास गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून सुरू असतो. पोलिसांना दाखल गुन्ह्यांपैकी ५०३ प्रकरणे उघडकीस करणे शक्य झाले असून यात ५१६ जणांना अटक झाली आहे. वाहन चोरीच्या आकडेवारीची सरासरी काढल्यास दर महिन्याला किमान १०० हून अधिक वाहनांची चोरी होत असल्याचे स्पष्ट होते.

वाहनांचे प्रकार – चोरीस गेलेली वाहने

दुचाकी – ९९४

तीन चाकी – २३१

चार चाकी – ८५

अवजड वाहने – ३५

एकूण – १३४५