ठाणे: आनंद दिघे हे महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा त्यांच्या पद्धतीने बंदोबस्त करायचे आणि आज त्याच पद्धतीने हा न्याय चिमुकल्या दोन मुलींना मिळाला आहे. हा न्याय आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसैनिकांनी एकत्र येऊन अक्षय चकमकीत ठार झाल्याबद्दल आनंद साजरा केला. त्यावेळी नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिल्यास आनंद दिघे यांच्या काळात त्या स्त्रीला तात्काळ न्याय मिळायचा. त्याच पद्धतीने यावेळेसही तात्काळ निसर्गाने हा न्याय दिलेला आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या या ठाणे जिल्ह्यात जी क्रुर घटना घडली. त्या आरोपीला नियतीने न्याय दिलेला आहे. आनंद दिघे यांचा एक शिष्य या शासनामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम पाहतोय, त्यांच्या काळात या चिमुकल्यांना न्याय मिळाला आहे. आज, आनंद दिघे असते तर, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ थोपटली असती, असे वक्तव्य नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

हेही वाचा : Badlapur Sexual Assualt : “पीडितेच्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न”, असीम सरोदेंचा मोठा दावा

जे पोलीस दिवस रात्र आपले संरक्षण करतात त्यांना मारण्याचा हा प्रयत्न होता. परंतू, स्वसंरक्षणार्थ त्यांनी केलेल्या त्या झटापटीत आरोपीचा मृत्यू झाला. तर, त्याला एन्कॉऊंटर कसे म्हणतात. देवाने हा न्याय दिलेला आहे. परंतू, भविष्यामध्ये या प्रकारच्या घटना घडवून आणणाऱ्या क्रुर कर्म करणाऱ्यांसाठी हा इशारा आहे. महिलेकडे वाईट नजरेने सुद्धा पाहणाऱ्याच्या हिंमतीला लगाम या घटनेने घातलेला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

परंतू, या घटनेतील आरोपीला शिक्षा देण्यासाठी विरोधी पक्षांनी पूर्ण दिवस बदलापूर बंद केले. हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील बॅनर झळकावले, सत्ताधारी पक्षावर टीका केली. या आरोपीला तात्काळ फाशी द्या, असे म्हणत आंदोलन केले. लोकांची सहानुभूती घेण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले. पवारांसारखे नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते. त्या क्रुर कर्म्याच्या विरोधात आणि राज्य सरकारच्याविरोधात विरोधकांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. परंतू, आज त्याच आरोपीला नियतीने डाव साधत शिक्षा दिली. तर, तो विरोधकांना प्रिय झाला. येवढा पुळका विरोधकांना त्या आरोपीचा आला आहे.

हेही वाचा : ठाण्यात थकबाकीदारांच्या ६११ नळजोडण्या खंडीत, ३० मोटर पंप जप्त; सुमारे ३३ कोटी रुपयांची पाणी देयकांची वसुली

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन याची १०० कोटींच्या वसुली करता हत्या करणारा सचिन वाझे हा पोलिस अधिकारी संजय राऊत यांचा पीए होता. सचिन वाझेचे तोंडभरुन कौतुक करणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिरेन प्रकरणी विधान परिषदेत मूग गिळून बसले होते, अशी टीका खासदार म्हस्के यांनी यावेळी केली. तेलंगाणातील बलात्कार प्रकरणात एनकाउंटर करणाऱ्या पोलिसांचे सामनात जाहीर कौतुक केले. मात्र, महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर तुम्ही संशय व्यक्त करता, त्यांचे कौतुक करायला तुम्हाला लाज वाटते का, असा सवाल खासदार म्हस्के यांनी केला.