ठाणे : ठाणे – मुलुंड दरम्यान होणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकाची खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी आणि रेल्वे अधिकारी यांच्यासह पाहणी केली. यावेळी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह चर्चा करुन तात्काळ मोजणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर, मोजणी होईपर्यंत रेल्वे आणि ठाणे महापालिकेमधील करारनामा तात्काळ मंजुर करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जेणेकरून ठाणे महापालिकेकडे स्मार्ट सिटी अंतर्गत उपलब्ध असलेला निधी रेल्वेला रक्कम भरून स्थानकाच्या इमारतीचे आणि रुळाचे काम सुरू करता येईल. यावेळी अधिकाऱ्यांनी १५ दिवसात करारनामा मंजूर करून देऊ असे सांगितले.
तसेच कोपरी आनंद नगर दिशेला उतरणारे पादचारी पूलालगत असलेल्या डी पी रस्त्याचे काम तत्काळ सुरु करा जेणेकरून कोपरी आनंद नगर परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल अशा सूचना खासदार राजन विचारे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या परिचालन क्षेत्रात एकूण २० पैकी ११ पिलरचे काम पूर्ण झाले आहे. तर, गर्डर आणि सॅटीस डेक चे काम सुरु असून याचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होऊन नवे रेल्वे स्थानक प्रवाश्यांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
असे असेल नवे स्थानक
- संपूर्ण नवे स्थानक १४.८३ एकर जागेवर होणार असून त्यापैकी ३.७७ एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला २ मजली इमारत उभी राहणार आहे. हे काम रेल्वे करणार आहे.
- या स्थानकांवर एकूण तीन फलाटांपैकी एक होम प्लॅटफॉर्म असणार आहे.
- या स्थानकात तीन पादचारी पुल असणार आहेत.
- परिचालन क्षेत्राचे काम ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे.
- स्टेशन इमारती समोर १५० मीटर लांब व ३४ मीटर रुंद असा सॅटिस असणार आहे.
- २.५ एकर जागेमध्ये चार चाकी व दोन चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था असणार आहे.
हेही वाचा : महेश गायकवाड यांच्या स्वागताचे कल्याणमध्ये फलक, फलकांवर भावी आमदार, टायगर म्हणून उल्लेख
- त्यामध्ये स्टेशनला जोडणाऱ्या ३ मार्गीका,
- पहिली मार्गिका नविन ज्ञानसाधना कॉलेज च्या मागून अप -डाऊन असणार आहेत त्या हायवे पूर्वद्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहेत.
- दुसरी मार्गिका जुने ज्ञानसाधना कॉलेज मार्गावर अपडाऊन असणार आहे.
- तिसरी मार्गिका मुलुंड चेक नाका मार्गे बाहेर पडणारी अपडाऊन असणार आहे.
- तसेच नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत. तसेच कर्जत कल्याण च्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत.
•ठाणे स्थानकातील सुमारे ३१ टक्के आणि मुलुंड स्थानकातील २१ टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.