ठाणे : कल्याण येथे मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळविक्रेत्याला हिंदीत का बोलतो मराठीत बोल असे म्हटल्याने त्याला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. त्याच्या माफीचे चित्रीकरण मोबाईल प्रसारित करण्यात आले. तसेच तरुणावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. तर माफी मागण्यास भाग पाडणाऱ्या आठ ते १० जणांविरोधात रात्री उशीरा मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हे सर्व एका पक्षाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : कल्याणमधील विठ्ठलवाडीत इमारतीच्या सज्ज्यावर अडकलेल्या बालकाला अग्निशमन जवानांनी वाचविले
डायघर भागात २१ वर्षीय मुलगा राहतो. गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तो मुंब्रा येथील कौसा भागात फळविक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी फळ विक्रेता त्याच्याशी हिंदीत बोलू लागला. त्यामुळे मराठी बोला असे तो तरुण म्हणाला. त्यामुळे फळ विक्रेता आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादानंतर फळ विक्रेत्याने त्याच्या सहकाऱ्यांना बोलाविले. ते सहकारी आल्यानंतर त्यांनी तरुणाला कान पकडून माफी मारण्यास भाग पाडले. तसेच तो माफी मागत असल्याचे चित्रीकरणही प्रसारित केले. या घटनेनंतर फळ विक्रेता मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला. तसेच त्या तरुणाविरोधात त्याने तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर तरुणाविरोधात शिवीगाळ आणि धमकाविल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर अखेर पोलिसांनी फळ विक्रेत्यासह आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. कल्याण येथे मराठी कुटुंबाला मारहाणीची घटना ताजी असतानाच पुन्हा असाच प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
© The Indian Express (P) Ltd